महिलांनी उभारला फळप्रक्रिया उद्योग
*कोकम ज्युसचे उत्पादन
*वणीच्या महिलांचा उपक्रम
*85 लाखाचा प्रकल्प
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतकरी शेती क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवित आहे. अशा वेगळ्या उपक्रमात जिल्‍ह्यातील महिलाही मागे नसल्याचे वणी येथील छाया संजय कोडगिरवार या महिलेने दाखवून दिले आहे. 85 लाख रूपये लागत असलेल्या फळप्रक्रिया उद्योग उभारून या महिलेने कोकम ज्युसचे उत्पादन वणी येथे सुरू केले आहे. जिल्ह्यातील इतर होतकरू महिलांसाठी त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.
वणी येथील छाया कोडगिरवार या सुशिक्षीत बेरोजगार महिला होत्या. घरकाम करीत असतानाच काही तरी वेगळे करायचे ही त्यांची इच्छा होती. या इच्छेतूनच कृषि आधारीत एखादा उद्योग सुरू करता येईल काय, याची माहिती घेतली. यातून फ्रुट ज्युस बनविण्याचा उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. उद्योगासाठी जागा व भांडवलाची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी वणी येथीलच स्वाती उदय गुजलवार या महिलेला आपल्या उद्योगात भागीदार करून घेतले. 85 लाख रूपये खर्चाचा प्रकल्प आराखडा तयार करून श्री साई अमृत फ्रुट प्रोसेस नावाने त्यांनी उद्योग सुरू केला.
उद्योगासाठी सेंट्रल बँक ऑफ वणी कडून 20 लाख रूपयांचे मुदती कर्ज मिळाले. महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषि व्यापार संघ, पुणे यांच्याकडून 4 लाख 80 हजार रूपयांचे बिजभांडवल तर कृषि विभागाकडून 9 लाख 60 हजारांचे अनुदान मिळाले. उर्वरीत रक्कम दोनही महिलांनी भागीदारीतून उभारली. त्यानंतर फेब्रुवारी 2013 पासून कोकम ज्युस निर्माण करण्यास सुरूवात केली. यासाठी लागणारा कोकम आगळ हा कच्चा माल कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांकडून खरेदी केला. त्यावर प्रक्रिया करून कोकम ज्युसचे उत्पादन सुरू आहे.
या ज्युस उत्पादन उद्योगातून आठ स्त्री-पुरूषांनाही रोजगार प्राप्त झाला आहे. स्थानिक बाजारात ज्युसला चांगली मागणी असल्याने एक लिटरला 50 रूपये याप्रमाणे भाव मिळतो. प्रती महिना वाहतूक खर्चासह 100 किलोग्रॅमच्या कच्चा मालासाठी 60 हजार रूपये इतका खर्च येतो. मजुरी साधारणत: 50 हजार, बॉटल पॅकिंगसाठी 3 हजार, वीज पुरवठा 20 हजार व इतर खर्च 40 हजार असा महिन्याला एक लाख 73 हजार रूपये इतका खर्च होतो. तर उत्पादन दोन लाख रूपयांचे होते. त्यामुळे प्रती महिना 27 हजार रूपये इतका नफा या उद्योगातून महिलांना होत आहे.
कृषि विभागाचे मार्गदर्शन मोलाचे ठरले : छाया कोडगिरवार
            कृषि विभागाच्या वतीने वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व अनुदानामुळे फळप्रक्रिया उद्योग उभा राहू शकला. सध्या उद्योगातील उत्पादन कमी प्रमाणात आहे. उत्पादन वाढल्यानंतर नफाही वाढणार आहे. भविष्यात चिंचेचे चॉकलेट व खट्टी मिठी इमली बनवून बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कोकम ज्युसचे उत्पादन व दर्जा वाढविण्यास मदत झाली असल्याचे छाया कोडगिरवार यांनी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी