संवादपर्व कार्यक्रमात शेततळे व जलयुक्त शिवारची जनजागृती
मनपूर येथे संवादपर्व कार्यक्रम
            यवतमाळ, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयावतीने गणेश उत्सवात संवादपर्व कार्यक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमाअंतर्गत मनपूर येथे शेततळे, जलयुक्त शिवार तसेच कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती गावक-यांना देण्यात आली.
               कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे,  कृषी पर्यवेक्षक ए.बी.दिवे, उपसरपंच संतोष पांडे, गावातील पाणलोट समितीचे सचिव दशरथ खडके यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
               मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. मागेल त्या प्रत्येक शेतक-यास शेततळे मंजूर केले जाते. यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. गावातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.भवरे यांनी केले. शेततळयांमुळे शेतातच हक्काच्या सिंचनाची सुविधा निर्माण होवू शकते. पावसाने खंड दिल्यास किंवा दुबार पिक घेतल्यास एक किंवा दोन पाळी पाणी या शेततळयातून दिल्या जावू शकते.  यातून शेतक-याच्या उत्पन्नातही  वाढ होते.  त्यामुळे ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
               जलयुक्त शिवार ही शासनाची आणखी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयातील प्रत्येक गावे जलमय करण्यात येणार आहे. गावक-यांनी या अभियानात लोकसहभागाच्या माध्यमातून सहभागी व्हावे.  गावात योजनेअंतर्गत चांगली कामे होण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घ्यावा असेही श्री.भवरे यांनी यावेळी सांगितले.
               यावेळी बोलतांना जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी गावक-यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सर्वसामान्यांच्या विशेषत: शेतक-यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावक-यांनी या योजना समजून घेतल्या पाहिजे. तसेच ख-या लाभार्थ्यांनी लाभासाठी पुढे आले पाहिजे असे श्री.वरकड म्हणाले, प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक ए.बी.दिवे यांनी केले. कार्यक्रमास गावकरी विशेषत: युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                            00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी