एकाच वर्षात 119 हेक्टरवर फळझाड लागवड
* 117 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
* 71 गावातील शेतकऱ्यांचा समावेश
* रोहयो निगडीत फळबाग कार्यक्रम
यवतमाळ, दि. 28 : रोजगार हमी योजनेंतर्गत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत फळबागांखाली अधिकाधिक क्षेत्र यावे यासाठी कृषि विभागाच्या वतीने अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या वर्षी सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील 119 हेक्टरवर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या या योजनेमुळे पारंपरीक पिकांवरील शेतकऱ्यांची अवलंबितता कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.
शेतकऱ्यांना पारंपरीक पिकांसोबतच फळपिकांमधून उत्पन्न वाढीसाठी जोड देणे आवश्यक आहे. त्यासाठीच रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची ही योजना जिल्ह्यात जाणिवपुर्वक राबविली जात आहे. फळझाड लागवडीस पहिल्या वर्षीच मोठा खर्च करावा लागतो. त्यानंतर खर्चाचे प्रमाण दरवर्षी कमी कमी-कमी होत जाते. शेतकऱ्यांना या पिकाकडे वळविण्यासाठी लागवडीकरीता रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या वर्षी ही योजना जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये राबविण्यात आली. योजनेसाठी एकुण 114 हेक्टरचे लक्ष्य ठरविण्यात आले. या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाते. ग्रामसभेच्या संमती आणि तांत्रिक मान्यतेनंतर 117 लाभार्थ्यांना फळझाड लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली. विशेष म्हणजे 71 गावातील 117 शेतकऱ्यांनी 119 हेक्टरवर सदर फळझाडांची लागवड केली आहे.
या शेतकऱ्यांना लागवडीसाठी कृषि विभागाच्या वतीने अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. यात झाडांची वाढ पाहून अनुदान दिले जाते. लागवडीनंतर समाधानकारक वाढ आढळून आल्यानंतर या शेतकऱ्यांना 35 लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. लागवड करण्यात आलेल्या फळझाडांमध्ये आंबा, सिताफळ, संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, कागदी लिंबू आदींचा समावेश आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळझाडांची लागवड होत असल्याने दरवर्षी जिल्ह्याचे फळझाडांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्यासोबतच फळांची उपलब्धताही वाढणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी