समाजातील शांततेसाठी उपक्रम वर्षभर राबविणार
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
            यवतमाळ, दि. 8 : गेल्या काही वर्षांमध्ये केवळ सणांच्या काळात समाजातील शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले. मात्र याचा पाहिजे त्या प्रमाणात परिणाम झालेला नाही. समाजावर दूरगामी परिणाम व्हावा, अनूचित प्रकारांचा शोध घेऊन आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीच्या माध्यमातून जिल्हाभरात वर्षभर उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आयोजित शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या पाहता पोलिस बल अत्यंत कमी आहे. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलिस मित्र, शांतीदूत यासारख्या पर्यायी यंत्रणेची व्यवस्था करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे समाजातील चांगले नेतृत्व समोर येऊन समाजामध्ये चांगले कार्य घडू शकेल. इतर जिल्ह्यांशी तुलना करताना यवतमाळ जिल्हा हा अतिशय शांत जिल्हा आहे. केवळ काही लोकांमुळे अनुचित प्रकार घडत असताना संपूर्ण नागरीकांना दोष देणे योग्य नाही. ज्या नागरीकांमुळे असे प्रकार घडतात, त्यांना शोधून अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी समितीच्या सदस्यांनी कार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजात सौदार्हतेचे वातावरण तयार करण्यासाठी युवकांना अशा बाबींची माहिती देणे गरजेचे आहे. समाजातील तक्रारी करताना त्यामागील कारणेही शोधणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी समाजातील चांगल्या नागरीकांचे सहकार्य घेऊन येत्या काळात दूरगामी परिणाम घडवून आणणारे उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सिंह म्हणाले, सार्वजनिक सण उत्सवांमध्ये अनूचित प्रकार घडण्याअगोदरच उपाययोजना करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. प्रामुख्याने युवकांमध्ये जाणीव, जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क जुळविणे आवश्यक आहे. समाजात एक प्रकारची सकारात्मक भावना घडवून जे भरकटलेले युवक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल. यासाठी त्यांना चांगल्यांची साथ द्यावी लागेल.
डॉ. डोळे यांनी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यामागे केवळ सण उत्सवात शांतता निर्माण करणे नसून वर्षभरात विविध जाती-धर्माचे जे सण साजरे होतात, त्यामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी ही समिती कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. येत्या काळात जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये समितीच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सदस्यांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते शांतीदूताचे बॅचेस वितरीत करण्यात आले. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी