उमरखेड, महागाव परिसरात बीटी कपाशीवर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भाव
यवतमाळ, दि. 1 : कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ आणि कृषी विभागाचे सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या संयुक्त निदान चमुने नुकत्याच केलेल्या प्रक्षेत्र भेटी, सर्वेक्षणात उमरखेड तालुक्यामध्ये विडुळ येथे शेतामध्ये बीटी कपाशी आरसीएच 659 फर्स्ट क्लास आढळून आला. यापुढे शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर क्षेत्रामध्ये सुध्दा वाढु शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापनाच्या दृष्टीने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. परंतु पांढरकवडा आणि झरीजामणी तालुक्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. राळेगावमध्ये अत्यल्प (0.3 टक्के) आढळून आला.
फार मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशीची लागवड शेतकरी करीत असल्यामुळे बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या फवारण्यामध्ये घट झाली. परंतु त्याची जागा बऱ्याच प्रमाणात सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि वाढ संप्रेरकाच्या फवारण्यांनी घेतली. यामुळे पीक कोवळे आणि लुसलुसीत होते. सुरुवातीला दुय्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसशोषक किडीच्या प्रादुर्भावामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
संपूर्ण बीटी कपाशी उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात न करता आपल्या सोईनुसार त्यामध्ये बदल केले. याचा परिणाम, ज्या बोंडअळ्याच्या व्यवस्थापनाकरीता बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले, त्या बोंडअळ्याच्या व्यवस्थापनाकरीता बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले. त्या बोंड अळ्याचाच प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. मागील वर्षी गुलाब (शेंदरी) बोंडअळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात बीटी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर नोंदविण्यात आला. प्रादुर्भावाची टक्केवारी पाहता गुलाबी बोंडअळी येणाऱ्या काळात निश्चितच शेतकऱ्यांच्या समोर व्यवस्थापनाच्या नवीन आव्हानाच्या स्वरूपात उभी दिसते आहे.
गुलाबी बोंडअळीची अंड्यातून बाहेर आलेली अळी प्रथम पांढुरकी असते. मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. पूर्ण वाढलेल्या अळीची लांबी 18 ते 19 मिमी असते. गुलाबी बोंडअळीला शेंदरीअळी सुध्दा म्हणतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या एकदम बोंडात शिरल्यानंतर बोंडातच अळी अवस्था पूर्ण करते अळी अवस्था 8 ते 28 दिवसाची असते त्यानंतर बोंडात गोल छिद्र करून कोषाअवस्थेत जाण्यासाठी बाहेर पडते आणि जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात किंवा ढेकलाखाली किंवा उमलेलेल्या बोंडातील कापसावर कोषामध्ये जाते. कोषावस्था 6 ते 20 दिवसांची असते. आपल्या भागात कोरडवाहू कापूस पिकावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यामध्ये हिरव्या बोंडामध्ये आढळून येतो. या बोंडअळीची वाढ साधारणत: उष्ण आणि ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरीची जोड असल्यास झपाट्याने होते.
प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमलेलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच डोमकळी म्हणतात. सध्या प्रादुर्भाव फुलोरा अवस्थेत आढळून आला आहे. या बोंड अळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की ती बोंडावरील छिद्र करीत असल्याने बोंडाचे वरून निरिक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु हिरवी बोंडे फोडून पाहिल्यानंतर आतमध्ये गुलाबी रंगाच्या अळ्या दृष्टीस पडतात. प्रादुर्भावग्रस्त बोंडे परीपक्व न होताच उमलतात. त्यामुळे कपाशीची प्रत बिघडते. बोंडातील अळ्या रुईमधून छिद्र करून सरकी खातात. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळ्या आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात. त्यामुळे रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे करावे
नियमित बीटी कपाशीच्या शेताचे सर्वेक्षण करून गुलाबी बोंड अळ्यांनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठली किंवा नाही, हे पाहण्यासाठी आपल्या कपाशी पिकाचे दर आठवड्याला शेतामध्ये फिरून गुलाबी बोंड अळ्याचे अस्तित्व आणि प्रादुर्भावाबाबत निरीक्षण करावे. ही झाडे शेताचे प्रतिनिधीत्व करतील, अशी निवडावीत. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत आणि यापैकी गुलाबी बोंड अळ्यांनी छिद्र केलेली किती आहेत, ती काळजीपूर्वक पाहून मोजावीत. हे नुकसानीचे प्रमाण 5 टक्के किंवा त्यापेक्षा जासत आढळून आल्यास गुलाबी बोंडअळ्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. नुकसानीचे 5 टक्के प्रमाण ही बोंड अळ्यासाठी आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करण्यात आली आहे. ही नुकसानीची पातळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर, कपाशीच्या जातीवर अवलंबून असते. बीटी रहित कपाशी बियाण्याची किंवा भेंडीची उशिरा लागवड करावी, गुलाबी बोंडअळ्याच्या व्यवस्थापनाकरीता हंगामामध्ये ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची अंडी असलेली ट्रायकोकार्डस याप्रमाणे शेतात लावावेत, कपाशीचे पिक डिसेंबरच्या आत संपविणे फरदड पिक घेवू नये, कपाशी पिकाचे अवशेष लवकरात लवकर नष्ट करणे किंवा उपयोगात आणवे, कपाशीची शेवटची वेचणी संपल्यानंतर लगेच शेतात जनावरे उदा. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, इत्यादी सोडाव्यात म्हणजे त्या कपाशीच्या झाडावरील किडकी बोंडे, पाने इत्यादी खावून टाकतील त्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या किडीच्या सुप्तावस्था नष्ट होतील, उपटलेल्या पऱ्हाट्याचे ढीग शेतात तसेच न ठेवता ते गावाजवळ आणून ठेवावे आणि त्यांचा वापर पेरणीपूर्वी करावा किंवा त्यांचा यंत्राद्वारे कुट तयार करून कंपोस्टसाठी वापर करावा. म्हणजे त्यामध्ये असलेल्या किडीचा सुप्तावस्थाचा नाश होईल. अधिक घनता लागवड पद्धतीमध्ये कमी कालावधीचे (150 दिवस) वाण अधिक उत्पन्न देतात.  गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून बचाव करतात. हंगामामध्ये बीटी कपाशीचे शेतात कामगंध सापळे लावून मोठ्या प्रमाणात नर पतंग जेरबंद करून गुलाबी बोंडअळीच्या पुढच्या पिढीस अटकाव करते. पिक 45 ते 50 दिवसाचे झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंड अळीसाठी हेक्टरी 4-5 फेरोमोन सापळे पिकामध्ये दीड फुट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंड अळीचे लिंग प्रलोभने (ल्युअर) गॉसिप्लयुर असावेत. हे लिंग प्रलोभने ल्युअर दर तीन आठवड्याच्या अंतराने बदलावे. या सापळ्यामध्ये दोन ते तीन दिवस सतत 8 ते 10 पतंगा आढळून आल्यास त्वरीत व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. मार्केट स्थळी, जिनिंग फॅक्टरीमध्ये कामगंध सापळे लावल्यास हंगामामध्ये पतंग नष्ट करण्यास मदत हेाते. बीटी कपाशीच्या शेतात हिरवी बोंडे फोडून नियमित सर्वेक्षण करणे व 10 टक्के प्रादुर्भाव आढळून आल्यास व्यवस्थापनाचे उपाय अंमलात आणावे. फिनॉलफॉस किंवा थायोडिकार्ब किटकनाशकाचा पिकाचा सुरवातीच्या काळात गरज भासल्यास उपयोग करावा. ऑक्टोबरनंतर सिंथेटीक पायरेथाईडसचा आर्थिक नुकसान पातळीवर आधारीत अवलंब करावा. नोव्हेंबरच्या आधी सिंथेटीक पायरेथाईडसचा वापर कटाक्षाने टाळावा. जेणेकरून पांढरी माशीचा उद्रेक होणार नाही. शक्यतोवर रस शोषक किडींना प्रतिकारक जाती निवड करावी. जेणेकरून किटकनाशकाचा वापर कमी करण्यास मदत मिळून पिकाचा कालावधी लांबणार नाही. शेंदरी बोंडअळीचे नियंत्रणासाठी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून खालील किटकनाशकापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 0.03 टक्के 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 5 टक्के डब्ल्यूडब्ल्यू 5 मिली. क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 मिली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्यूपी 20 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस 16 टक्के अल्फासारपरमेथ्रीन 1 टक्के इसी 50 मिली ट्रायझोफॉस 40 इसी 30 मिली प्रोफेनोफॉस 50 इसी 30 मिली क्लोरपायरीफॉस 50 टक्के 20 मिली, इंन्डोकझाकार्ब 15.8 इसी 10 मिली फिप्रोनील 5 टक्के एससी 40 मिली. इमामेक्टीन बेन्झोएट 1.9 टक्के इसी. 11.6 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 इसी 12 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40 टक्के सायपरमेथ्रीन 4 टक्के मिश्र किटकनाशक 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 4.4 गॅम किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के सायपरमेथ्रीन 5 टक्के मिश्र किटकनाशक 20 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीपोली 18.5 एससी 3 मिली किंवा डेल्टामेथीन 1 टक्के ट्रायझोफॉस 35 टक्के मिश्र किटकनाशक 17 मिली किंवा अल्फा सायपरमेथीन 10 टक्के प्रवाही 6 मिली किंवा कार्बारील 85 टक्के डब्ल्यूपी 28 ग्रॅम किंवा बिव्हेरीया बॉसीयाना 1.15 टक्के डब्ल्यूपी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे प्रमाण साध्या पंपाचे आहे. पॉवर स्प्रेयरने फवारणी करावयाची असल्यास औषधाचे प्रमाण तीनपट करावे व पाण्याचे प्रमाण एक तृतीयांश लागेल अशाप्रकारे काटेकोरपणे अवलंब केल्यास शेंदरी बोंडअळीचे चांगल्याप्रकारे नियंत्रण होते. आवश्यकता भासल्यास 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. आलटून-पालटून औषधांचा वापर करावा. एकच एक औषध वारंवार फवारू नये. म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक राहून व्यवस्थापनाचे उपाय त्वरीत अंमलात आणावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे, डॉ. सी. यू. पाटील सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी