सार्वजनिक उत्सवांना प्रसाद वितरणासाठी प्रमाणपत्र घ्यावे लागणार
यवतमाळ, दि.7 :जिल्ह्यात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या मंडळातर्फे प्रसाद वितरण करण्यात येतो.आता या प्रसाद वितरणासाठी अन्न सुरक्षाव मानके अधिनियम 2006 नुसार असलेलेल नियम व नियमन 2011 मधील तरतुदीनुसार प्रमाणपत्र घेणे आवश्यक असणार आहे.
सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे आणि त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक मंडळाने ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्रासाठी fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून 100 रूपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे.प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ आणि आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्न परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावा, तसेच प्रसाद बनविणाऱ्या कॅटरर्सची माहिती अद्यावत  ठेवावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी.
फळाचा  प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना, नोंदणी असलेल्यांकडून खरेदी करावा, कच्चे, सडलेले किंवा खराब फळांचा वापर कोणत्याही  परिस्थितीत करण्यात येऊ नये. प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहिल याची खात्री करावी.आवश्यकता असेल तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी.प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य, पोर्टेबल असावे. प्रसाद बनविणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी आदी पुरविण्यात यावे, तसेच प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.
दुध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील, असे कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत, खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी, प्रसादामध्ये याचा वापर होत असल्यास दक्षता घ्यावी, जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला खवा, मावा प्रसादासाठी वापरू नये, अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे, त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त ज. रा. वाणे यांनी कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी