प्रशिक्षीत युवकांना दिली मुद्रा योजनेची माहिती
* आकपुरी येथे संवाद पर्व कार्यक्रम
* युवकांना दिली मुद्रा योजनेची माहिती

यवतमाळ, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आकपुरी येथे संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संवाद पर्व उपक्रमातून जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. 
कार्यक्रमाला माहिती सहायक गजानन कोटुरवार, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार भितकर, प्रकल्प शिक्षण सन्वयक सुनील भेले, आकपुरी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक आडे, मुख्याध्यापक संजीव राऊत, सन्वयक संजय सरोदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे धर्मेश रंगारी, सुनील कदम आदी उपस्थित होते.
श्री. कोटुरवार यांनी देश आणि राज्य पातळीवर युवकांना कौशल्य पुरवून त्यांच्यात उद्योजकता निर्माण करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येत आहे. कुशल भारत योजनेतून युवकांना कौशल्य तर उद्योग उभारण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून विनातारण कर्ज उपलबध् करून देण्यात येत आहे. याचा प्रशिक्षित युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून शासकीय नोकऱ्या ह्या अत्यल्प असल्याने युवकांनी स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक आहे. स्वत: उद्योग उभारून इतरांनाही रोजगार पुरविण्याची क्षमता ही स्वयंरोजगारात असल्याचे सांगितले. येता काळ हा कौशल्यप्राप्त व्यक्तींचाच असून तंत्रज्ञानाच्या मदतीने गावागावात रोजगार उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
श्री. भितकर यांनी युवकांनी व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन कशाप्रकारे आर्थिक परिस्थिती सुधारता येते, याबाबत माहिती देऊन ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होऊ शकणाऱ्या व्यवसायांची माहिती दिली. अत्यल्प भांडवलामध्ये स्वयंरोजगार ग्रामीण भागामध्ये कशाप्रकारे उपलब्ध होत आहेत, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. युवकांनी कौशल्य प्राप्त केल्यास त्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ ही कशा पद्धतीने वाढते, याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुख्याध्यापक श्री. राऊत यांनी विना अनुभव आज अकुशलही रोजगार मिळत नसल्याचे सांगितले. युवकांनी शासनाच्या प्रशिक्षण योजनांचा लाभ घेऊन गावातच स्वयंरोजगार सुरू करावा, असे आवाहन केले. श्री. भेले यांनी सर्व पातळीवर कुशल युवक घडविण्याचे काम होत असताना आता युवकांनी मागे राहून चालणार नाही. प्रत्येकाच्या अंगी एकतरी कौशल्य असावे, त्याचा त्याने आपल्या जीवनात उपयोग करावा, असे आवाहन केले. 
गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण व युवा कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत घाटंजी तालुक्यातील आकपुरी येथे जनसेवा ग्रामीण विकास प्रतिष्ठान व शिक्षण संस्था, टाटा ट्रस्ट व यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे ग्रामीण भागातील युवकांसाठी ‘रिपेअर अँड मेंन्टेनन्स ऑफ सेल्युलर फोन’ हा तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणस्थळी संवाद पर्व हा कार्यक्रम घेण्यात आला.
संतोष पगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सेतू केंद्र गाव समन्वयक अनिता मडावी, सुनील निबुदे, तृष्णा नीत, वृषाली बुल्ले यांनी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी