जिल्ह्यात पिककर्ज वाटपाचा नवा उच्चांक
*चालू वर्षात 1089 कोटी पिककर्ज वाटप
*1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना पिककर्ज
*खरीप हंगामातच विक्रमी कर्ज वाटप
यवतमाळ, दि. 27 : ग्रामीण भागात खरीप हंगामासाठी पिककर्ज शेतकऱ्यांना फार मोठा आधार देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यास पिककर्ज मिळाले पाहिजे, या धोरणात्मक भुमिकेतून गेल्या दोन वर्षांपासून पिककर्ज वाटपाचे नियोजन करून ते राबविण्यात येते. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच 1 हजार 89 कोटी इतक्या पिककर्जाचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख 48 हजार शेतकऱ्यांनी या कर्जाचा लाभ घेतला आहे.
ग्रामीण भागात अद्यापही पेरणीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाशिवाय चांगला पर्याय नाही. शासनाने अल्पदरात तसेच मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्याजामध्ये सवलतीची योजना सुरू केल्याने पिककर्जच शेतकऱ्यांसाठी मोलाचा आधार ठरत आहे. शासनाच्या पिककर्जाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा कल राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याकडे वाढत आहे. गेल्या चार वर्षातील पिककर्ज वाटपाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणामुळे यावर्षी पहिल्यांदाच उच्चांकी म्हणजे 1 हजार 89 कोटी रूपयांच्या पिककर्जाचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण वर्षातही इतक्या रक्कमेच्या कर्जाचे वाटप झाले ऩ़व्हते.
सन 2013-14 यावर्षी 1 हजार 390 कोटींच्या पिककर्ज वाटपाचे लक्ष्यांक ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक लाख 47 शेतकऱ्यांनी 1 हजार 17 कोटीच्या कर्जाची उचल केली होती. त्यानंतर सन 2014-15 मध्ये 1 हजार 745 कोटीच्या पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यावर्षी एक लाख 28 हजार शेतकऱ्यांना 926 कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप केल्या गेले. कर्जवाटपाची टक्केवारी 53.06 इतकी होती.
गेल्यावर्षी सन 2015-16 या वर्षात 1 हजार 704 कोटी रूपयांच्या पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यात खरीप हंगामासाठी 1 हजार 653 कोटी तर रब्बीसाठी 51 कोटी रूपयांच्या वाटपाचे उद्दिष्ट होते.  प्रत्यक्षात एक लाख 62 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 72 कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. कर्जवाटपाची टक्केवारी 62.93 इतकी होती. यावर्षी 1 हजार 790 कोटींच्या पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यात खरीप हंगामासाठी 1 हजार 736 तर रब्बीसाठी 54 कोटींचे नियोजन आहे. आतापर्यंत खरीप हंगामातच 1 हजार 89 कोटींचे पिककर्ज एक लाख 47 हजार 535 शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. वाटपाची ही टक्केवारी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 63 टक्के इतकी आहे.
बँकामार्फत अद्यापही कर्ज वाटप सुरूच आहे. शिवाय शासनाने थकीत शेतकऱ्यांचे पुनर्गठण करून त्यांना नव्याने कर्ज वितरीत करण्याचे धोरण स्विकारल्याने या वर्षी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत विक्रमी कर्ज वाटप होणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी