अतिक्रमणधारकांवर एफआयआर दाखल करा
- सचिंद्र प्रताप सिंह
* लोकशाही दिन कार्यक्रमातील निर्देश
* अतिक्रमण काढण्याचा खर्चाची वसूली
* लोकशाही दिनात नागरिकांच्या समस्यांवर चर्चा
यवतमाळ, दि. 7 : सार्वजनिक जागेवर वारंवार अतिक्रमण करणाऱ्या किंवा हेतुपुरत्सर अतिक्रमण करून अतिक्रमण काढून टाकण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींवर एफआयआर दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
बचत भवन येथे आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रमात अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी दाखल होतात. वारंवार निर्देश देऊनही सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढले जात नाही. काल झालेल्या लोकशाही दिनातही अशाप्रकारच्या तक्रारी दाखल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
लोकशाही दिन कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ज्या व्यक्ती स्वत:हून अतिक्रमण काढत नसेल त्यांची अतिक्रमणे काढून यासाठी येणाऱ्या खर्चाची संबंधीतांकडून वसूली केली जावी. संबंधीतांनी खर्चाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास सक्तीने वसूली करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी दाखल तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभिरतेने दखल घेत संबंधीत विभागाने तक्रारींचा कालमर्यादेत निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आपल्या अडचणी घेवून आलेल्या नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी आत्मीयतेचा संवाद साधून त्यांचे म्हणने ऐकूण घेतले. ज्या तक्रारी तातडीने निकाली निघणे शक्य आहे. अशा तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जावी. ज्या तक्रारींना कार्यवाहीसाठी काही दिवसांचा अवधी लागणे आवश्यक आहे. त्या विहीत कालावधीत तक्रारकर्त्यांचे समाधान करून त्यांना अंतिम उत्तर पाठविण्याची व्यवस्था संबंधीत विभागाने करावी, असेही जिल्हाधिकारी यावेळी  म्हणाले.
बचत भवन येथे झालेल्या लोकशाही दिनात एकूण 47 तक्रारी, निवेदने दाखल झाली. त्यात महसूल विभागाची 7, पोलिस 4, कृषि 2, पाटबंधारे 9, जिल्हा परिषद 11, वीज वितरण 1, सार्वजनिक बांधकाम 1, सहकार 1, जीवन प्राधिकरण 2, वन 1 आणि इतर आठ अशा एकूण 47 तक्रारी प्राप्त झाल्या. मागील लोकशाही दिनातील 73 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी