विलगीकरण कक्षात एकूण 14 जण दाखल


v सहा दिल्लीवरून परत आलेले तर चार विदेशातून आलेल्यांचा समावेश
v भाजीपाला व किराणा आता सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळातच
v बाहेरून आलेल्यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन
यवतमाळ दि.  1 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण 14 जणांना दाखल करण्यात आले आहे. यात सहा जण दिल्लीवरून परत आलेले असून चार जण अमेरिकेतून आले आहेत. तर पूर्वीचे चार असे एकूण 14 जण आहेत. जिल्ह्यात पॉझेटिव्ह नमुने असलेल्यांची संख्या शुन्य असून गृह विलगीकरणात जवळपास 100 नागरिक आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
बाहेर देशात गेलेले 31 नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. विदेशातून तसेच निजामुद्दीन (दिल्ली) वरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन प्रशासनाशी संपर्क साधावा. जेणेकरून समुदायात संसर्ग होणार नाही. बाहेर देशात जाऊन आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही, त्यांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने 07232- 240720, 07232- 239515 तसेच टोल फ्री क्रमांक 104 त्वरीत संपर्क करावा. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात 230 बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
विलगीकरण कक्षात प्रिझेंमटिव्ह केसेस वाढत असल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सुचनेनुसार घरातच राहणे आवश्यक आहे. अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर निघालेच तर दोन नागरिकांमध्ये ठराविक अंतर असले पाहिजे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक दुकानांवर गर्दी करत असून ठरावीक अंतर ठेवत नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी बाजार इतर ठिकाणी ठराविक अंतराचा नियम पाळत नसल्यामुळे प्रशासनाने गुरुवार (दि.2) पासून जिल्ह्यातील भाजीपाला, किराणा दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळातच उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून दवाखाने आणि मेडीकल वगळण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचना न पाळणे तसेच कलम 144 चे उल्लंघन करणा-या 151 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून  4 लक्ष 81 हजार 900 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सात वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
जिल्ह्यात 16 ठिकाणी तात्पुरत्या निवा-याची सोय करण्यात आली आहे. यात 3961 जणांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच मध्यप्रदेश, आदिलाबाद, तामीळनाडू व इतर राज्यातील लोकांसाठी 5 ठिकाणी तात्पुरत्या निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 172 नागरिकांना ठेवण्यात आले आहे. या तात्पुरत्या निवा-यांमध्ये मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात येणार असून येथे राहणा-या लोकांना आपल्या स्वकीयांशी बोलण्यासाठी लँड लाईन फोनची व्यवस्था करण्याच्या सुचना भारत संचार निगम लिमिटेडला देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 600 शिवभोजन थाळी सुरू आहे. मात्र गुरवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कुठे 100 तर कुठे 75 याप्रमाणे एकूण 1250 शिवभोजन थाळी प्रतिदिन सुरू करण्यात येणार आहे.
बाहेरच्या सहा राज्यातील 4988 नागरिक आपल्या जिल्ह्यात  असून त्यांच्याकडून एक महिन्याचे घरभाडे न घेण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांना वस्तुंचा पुरवठा करण्यात येतो. आपल्या जिल्ह्याचे 15 राज्यात 848 नागरिक आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून त्या-त्या संबंधित राज्यांना आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी दररोज फालो-अप घेण्यात येतो. या नागरिकांना मदतसुध्दा मिळत आहे. आपल्या जिल्ह्याचे 2367 नागरिक महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात आहेत. तेथील प्रशासनासोबत बोलून त्यांना मदत मिळवून दिली जात आहे.
बाहेर देशातून आलेले नागरिक, त्यांच्या अतिशय संपर्कात आलेले नागरिक, लक्षणे असलेले नागरिक, तसेच इतर संपर्क आलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याच्यादृष्टीने प्रशासनाशी त्वरीत संपर्क करावा. डॉक्टरांनी नियमित लसीकरण मोहीम सुरू ठेवावी, यात कोणताही खंड पडू देऊ नये. तसेच पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ति पाच किलो धान्य शासनाच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल, असेही यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी