आयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्हसह 23 जण भरती


यवतमाळ, दि. 22 : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 23 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 
गत 24 तासात आयसोलेशन वॉर्डात चार जण येथे भरती झाले आहे. बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एकूण 29 नमुने नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले. तर आज 19 रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले असून यात 17 रिपोर्ट निगेटिव्ह तर दोन रिपोर्ट पुन्हा फेरतपासणीकरीता पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात गृह विलगीकरणात एकूण 793 जण तर संस्थात्मक विलगीकरणात एकूण 108 जण आहेत.
नागरिकांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जसे सहकार्य केले तसेच सहकार्य दुस-या टप्प्यातसुध्दा करावे. आरोग्याच्या दृष्टीने घरात राहणे, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्यास एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे आदी सुचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले ‘Aarogya Setu’ हे ॲप प्लेस्टोअर वरून ॲन्डड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे चार प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत की असुरक्षित, हे या ॲपमध्ये कळते. तसेच देशातील कोरानाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या ॲपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास एक लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे इतर नागरिकांनीसुध्दा हे ॲप त्वरीत डाऊनलोड करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी