दारव्हा येथील हॉटेल अश्विन बार ॲन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द


v दहा दिवसांत जिल्हाधिका-यांची तीन रेस्टॉरंटवर कारवाई
यवतमाळ, दि. 18 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाच्या अनुषंगाने आपात्कालीन आरोग्य विषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजन राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करून संचारबंदीच्या काळात अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या दारव्हा येथील हॉटेल अश्विन रेस्टॉरंट व बारचा परवाना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली अस्तित्वात आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून हेमंत नामदेवराव चिरडे यांच्या मालकीच्या दारव्हा येथील हॉटेल अश्विन रेस्टॉरंट व बार यांनी गैरमार्गाने आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने अवैधरित्या मद्य विक्री केल्याचे आढळून आले.
त्यांच्या या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून साथरोग नियंत्रण कायद्याचे व जिल्हाधिका-यांनी पारीत केलेल्या आदेशाचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन झाले आहे. तसेच मुंबई विदेशी मद्यनियम 1953 चे देखील उल्लंघन करण्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 56 (1)(ब) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हॉटेल अश्विन रेस्टॉरंट व बार, एफ. एल. -3 अनुज्ञप्ति क्रमांक 119/19-20 कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी