‘पॉझेटिव्ह ते निगेटिव्ह’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा - पालकमंत्री संजय राठोड




                                  v शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराबाबत आढावा
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसह संपूर्ण प्रशासन या आपात्कालीन परिस्थितीत अतिशय संवेदनशीलपणे काम करीत आहे. तरीसुध्दा भरती असलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक तथा बालरोग विभाग प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके आदी उपस्थित होते.
पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार ही अतिशय महत्वाची बाब आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केवळ पॉझेटिव्ह नमुने आलेल्या नागरिकांनाच वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करावे. विलगीकरणातील सर्वांनाच येथे पाठवू नये. जेणेकरून येथील डॉक्टरांना पॉझेटिव्ह रुग्णांवर लक्ष केंद्रीत करता येईल. रुग्णांच्या उपचाराबाबत कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही. पॉझेटिव्ह नागरिकांच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण करणे, त्यांचे नमुने घेणे, त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था करणे आदी बाबी शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कराव्यात. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेचे नियोजन करा. आपल्या अधिनस्त असलेला जिल्ह्यातील इतर स्टाफ यांना कामाला लावा. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करा. या परिस्थितीत कोणी कामचुकारपणा करीत असले तर त्याच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
भरती असलेल्या पॉझेटिव्ह नागरिकांना योग्य पध्दतीने हाताळणे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी आहे. येथे सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त कडक ठेवा. पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांना वेळेवर व चांगल्या दर्जाचे जेवण मिळाले पाहिजे. जेवणाच्या संदर्भात ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व वैद्यकीय प्रशासनाने मागवून घ्याव्यात. वॉर्डाची स्वच्छता, पिण्याचे पाणी सर्व गोष्टींची पुर्तता होणे गरजेचे आहे. विलगीकरणासाठी शासकीय व खाजगी वसतीगृह अधिग्रहीत करून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-याचे काम आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या नागरिकांना सकाळी 9 वाजता नास्ता व दुपारी 12 वाजता चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाते. याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी, फळे, प्रोटीनयुक्त पदार्थ तसेच व्हीटॅमीन ‘सी’ असलेले पदार्थ दिवसभरात देण्यात येते. जेवणाबाबत तक्रार येणार नाही, याची पुरेपुर काळजी घेऊ, असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी