लॉकडाऊनच्या काळात काही बाबींवर निर्बंध तर काहींमध्ये शिथिलता



v 20 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
यवतमाळ, दि. 18 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) च्या अनुषंगाने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यादरम्यान शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येणार असून काहींवर मात्र निर्बंध कायम राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
लॉकडाऊनच्‍या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील.
सुरक्षेच्‍या उद्देशाशिवाय रेल्‍वे मधून सर्व प्रवासी हालचाल, सार्वजनिक वाहतूकीसाठीच्‍या बसेस बंद राहतील. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा मार्गदर्शक तत्‍वानूसार परवानगी असलेल्‍या व्‍यक्‍ती वगळून व्‍यक्‍तींच्‍या आंतरजिल्‍हा व आंतरराज्‍य हालचालीकरीता बंदी राहील. याशिवाय सर्व शैक्षणिक प्रशिक्षण, संस्‍था व शिकवणी, विशेष परवानगी असलेल्‍या व्‍यतीरिक्‍त इतर सर्व औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना, विशेष परवानगी असलेल्‍या परवान्‍याशिवाय आतिथ्‍य सेवा बंद राहतील. तसेच टॅक्‍सी (अॅटो रिक्षा आणि सायकल रिक्षासह) आणि कॅब अग्रीग्रेटरच्‍या सेवा,  सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्‍पलेक्‍स, व्‍यायमशाळा व क्रीडा कॉम्‍पलेक्‍स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे, सर्व सामाजिक, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्ये, इतर मेळावे, सर्व धार्मिक स्‍थळे,  पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा आदींवर बंदी राहील.
अंत्‍यविधी सारख्‍या प्रसंगी वीसपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना परवानगी दिली जाणार नाही.  शहरी भागात बँकेच्या कामकाजाचा कालावधी हा सकाळी 8 ते दु.12 पर्यत राहील. शहरी भागात अत्‍यावश्‍यक दुकाने उघडण्‍याचा कालावधी सकाळी 6 ते दु.3 पर्यत राहील. दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ दुकाने उघडण्‍याचा कालावधी सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यत व सायंकाळी 6 ते 9 पर्यत राहील.
आयुषसह सर्व आरोग्यसेवा जसे रुग्‍णालये, नर्सिग होम, क्लिनिक, टेलिमेडीसीन्‍स सुविधा, डिस्‍पेन्‍सरीज केमिस्‍ट, औषधी दुकाने (जन औषधी केंद्र आणि वैद्यकीय साहित्‍यांचे दुकानासह), वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्रे, कोविड-19 च्‍या संबंधाने औषध व वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, संस्था, पशुवैद्यकीय रुग्‍णालये, दवाखाने,क्लिनिक, पॅथालॉजी लॅब, लस व औषधांची विक्री व पुरवठा, अधिकृत खाजगी आस्‍थापने जी कोविड-१९ च्‍या आवश्‍यकतेच्‍या सेवांच्‍या तरतुदीसाठी किंवा हा आजार रोखण्‍याच्‍या प्रयत्‍नांना समर्थन देतात ज्‍यात होमकेअर प्रदाते, डायग्‍नोस्‍टीक रुग्‍णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, तसेच सेवादेणारे रुग्‍णालये, औषधे, फार्माक्स्‍युटिकल्‍स वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्‍सीजन तसेच त्‍यांचे पॅकेजिंग साहित्‍य, कच्‍चा माल आणि मध्‍यवर्ती घटकांचे उत्‍पादन युनिट, रुग्‍णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय/आरोग्‍याच्‍या पायाभूत सुविधांचे बांधकाम, वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय व्‍यक्‍ती, वैज्ञानिक, परिचारिका, पॅरामेडीकल स्‍टॉफ, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, दाई आणि इतर आरोग्‍य विषयक सेवा, (रुग्णवाहिकेसह) सुरू राहतील.

कृषी व कृषी संबंधित कामाअंतर्गत शेती व फळबागा संबंधातील सर्व कामे पुर्णपणे कार्यरत राहतील. शेतामध्‍ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे करण्‍यास मुभा राहील. कृषी उत्‍पादने खरेदी करणा-या यंत्रणा तसेच शेतमालांची उद्योगाव्‍दारे, शेतक-याव्‍दारे, शेतकरी गटाव्‍दारे किंवा शासनाव्‍दारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणा-या यंत्रणांची कामे सुरु राहतील. कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या वतीने चालविण्‍यात येणा-या मंडी किंवा महाराष्‍ट्र शासनाने अधिसुचित केलेल्‍या मंडी सुरु राहतील. शेतीविषय यंत्राची व त्‍यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्‍ती करणारे दुकाने त्यांचा पुरवठा साखळीसह सुरु राहील. शेतीकरीता उपयोगात येणारे भाडेतत्‍वावरील अवजारे पुरवठा करणारे केंद्र, रासायनिक खते, किटकनाशके, बि- बियाणे यांचे उत्‍पादन वितरण व किरकोळ विक्री सुरु राहील. शेतमालाची काढणी व पेरणी करणा-या मशीन्‍स जसे कंबाईंड हार्वेस्‍टर आणि इतर कृषि अवजाराची राज्‍याअंतर्गत व आंतरराज्‍य वाहतूक सुरु राहील. मासेमारी व अनुषंगिक व्‍यवसायाकरीता वाहतूकीची मुभा राहील.
पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित दुध संकलन करणे, त्‍यावर प्रक्रिया करणे, त्‍याचे वितरण व विक्री, पशुपालन, कुकुटपालन व अनुषंगिक कामे, जनावरांच्‍या छावण्‍या व गोशाळा सुरु राहतील. आर्थिक बाबीशी संबंधित बॅंका, एटीएम, बॅंकेसाठी आवश्‍यक आय.टी. सेवा, बॅंकींग संवादक/ प्रतिनिधी सेवा, इत्‍यादी बॅंकींग सेवा नेमून दिलेल्‍या वेळेनूसार बॅंक शाखा सुरु राहतील. स्‍थानिक प्रशासनाने बॅंकेमध्‍ये सुरक्षा रक्षक नेमावे. तसेच बॅंक कर्मचारी व ग्राहक यांच्याकडून सामाजिक अंतर (Social Distancing), तसेच कायदा व सुव्‍यवस्‍था राखल्‍या जाईल याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सार्वजनिक सुविधेअंतर्गत पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी.गॅस यांची वाहतूक, वितरण, साठवण व किरकोळ विक्री, पोस्‍ट ऑफीस संबधित सर्व सेवा, पाणी, स्‍वच्‍छता, घनकचरा व्‍यवस्‍थापना बाबतची कार्यवाही याबाबतच्‍या सुविधा नगरपरिषद स्‍तरावर सुरु राहतील. तसेच दुरसंचार व इंटरनेट या सेवा सुरु राहतील.  वाहतूक करणारी ट्रक त्‍यासोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असणे आवश्यक आहे. मालवाहतूकीसाठी जाणारे खाली ट्रक किंवा मालवाहतूक करुन परत जाणारे खाली ट्रक यांना सुध्‍दा परवानगी राहील. वाहनचालक यांनी वाहन चालविण्‍याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक राहील. राज्‍य शासनाने ठरवून दिलेल्‍या किमान अंतरासह महामार्गावर ट्रक दुरुस्‍ती व ढाब्‍यांची दुकाने सुरु राहतील.
जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या पुरवठयामधील सर्व सुविधा सुरु राहतील. जीवनावश्‍यक वस्‍तू विकणारे प्रतिष्‍ठान धान्‍य व किराणा, फळे व भाज्‍या, दुधाची दुकाने, अंडे, मास, मच्‍छी, पशुखाद्य व त्यांचा चारा विक्रीची दुकाने सुरु राहतील. प्रिंट व ईलेक्‍ट्रॉ‍निक मिडीया, डिटीएच व केबल वाहिनी सेवा, माहिती व तंत्रज्ञानाच्‍या सेवा ५० टक्‍के कर्मचा-यासह सुरु राहतील. शासकीय कामाकरीता डाटा आणि कॉल सेंटर ग्रामपंचायत स्‍तरावरील सामान्‍य सेवा केंद्र, कुरिअर सेवा, शितगृहे आणि वखार महामंडळाची गोदामे, कार्यालय आणि निवासी संकुलांची देखभाल आणि देखभाल करण्यासाठी खाजगी सुरक्षा सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, लॉकडाउनमुळे, वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी व अडकलेल्या पर्यटक आणि व्यक्तींसाठी हॉटेल, लॉज सुरु राहतील. सेवादेणा-या व्‍यक्‍ती जसे इलेक्‍ट्रीशियन, संगणक/मोबाईल दुरुस्‍ती, वाहन दुरुस्‍त करणारे केंद्र, नळ कारागीर (प्‍लंबर), सुतार आदी जण शासनाच्या सुचनेनुसार कामे करू शकतील.
वरील मार्गदर्शक सुचनांबाबत करावयाची कार्यवाही दिनांक 20 एप्रिल 2020 पासून अंमलात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी