केशरी शिधापत्रिका धारकांनासुध्दा मिळणार अल्प दरात धान्य - पालकमंत्री संजय राठोड

                                 
                                  
v जिल्हाधिकारी कार्यालयातून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती
यवतमाळ, दि. 7 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांप्रमाणेच केशरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांनासुध्दा अल्प दरात धान्य मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
मुंबई येथून व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून सहभाग नोंदविला. केशरी शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन असल्यामुळे धान्य मिळत नाही, हा मुद्दा पालकमंत्री श्री. राठोड यांनी मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यावर या कार्डधारकांनासुध्दा अत्यल्प दराने धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील 3 कोटी 20 लक्ष केशरी शिधापत्रिकाधारकांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आता अत्यल्प दरात धान्य मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी जवळपास 250 कोटी रुपये खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.
तसेच एखादे कुटुंब रोजगारानिमित्त दुस-या तालुक्यात स्थलांतरीत झाले असेल व त्यांच्याजवळ मूळ तालुक्याचे राशन कार्ड असेल तर अशा कुटुंबांनासुध्दा सद्यस्थितीत वास्तव्य असलेल्या ठिकाणीच धान्य देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात प्रति व्यक्ति प्रति माह पाच किलो याप्रमाणे मोफत तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांना देण्यात येईल.
सद्यस्थितीत येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या कोरोना विषाणू संशयित नागरिकांचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात येते. त्यामुळे रिपोर्ट यायला वेळ लागत आहे, हा मुद्दा पालकमंत्र्यांनी उपस्थित केल्यानंतर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
याशिवाय कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांची नागरिकांना माहिती देणे. साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 बाबत माहिती अवगत करणे आदी विषयांवर मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी