कोरोनाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा




       यवतमाळ, दि. 15 : कोरोना विषाणु (कोव्हिड - 19) प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच त्या अनुषंगाने सर्व यंत्रणेची तयारी याबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला.
            नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एम.एस.फारुकी, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
            जिल्ह्यात संसर्गाच्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात औषधी आहे का, अशी विचारणा करून श्री. पियुष सिंह म्हणाले, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला प्राप्त हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळ्यांमधून काही पुरवठा वैद्यकीय महाविद्यालयाला करावा. जिल्ह्यात सर्वे दरम्यान सारीचे नमुने घेऊन त्यांचा डाटा अपडेट ठेवावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्तरावर रुग्णांची माहिती अपडेट ठेवावी. शासनाने व कंत्राटदाराने मजुरांसाठी तात्पुरते निवारागृहांची व्यवस्था केली आहे. येथे थांबलेल्या लोकांची पुन्हा मोजणी करावी. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांना प्राधान्याने अन्नधान्य किट व भोजनाची व्यवस्था प्रशासन तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात यावी.
            मोफत वाटण्यात येणा-या तांदळाची उचल 100 टक्के करून ते त्वरीत वाटावे. एपीएल धारकांना स्वस्त दरात धान्य वाटपाचे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नियोजन करावे. लोकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासणार नाही, या उद्देशाने बाजारात गहू, तांदूळ, तेल, किराणा मुबलक प्रमाणात ठेवावा. तसेच औषधीसुध्दा कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना केल्या.
            यावेळी त्यांनी संसर्ग झालेले रुग्ण, त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती, प्रतिबंधित क्षेत्र, निवारागृहमध्ये पुरविण्यात येणा-या सुविधा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वाटप करण्यात येणारे धान्य, कायदा आणि सुव्यवस्था, दिव्यांग नागरिकांना औषधी आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाटपाची स्थिती, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची उपलब्धता, कर्जवाटप, पाणी टंचाई आदी विषयांचा आढावा घेतला.
            बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी आदी उपस्थित होते.   
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी