'कोरोनामुक्त' जिल्ह्याच्या संकल्पासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक - पालकमंत्री संजय राठोड


                                                               
v जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांची बैठक
       यवतमाळ, दि. 10 : कोरोना (कोव्हिड - 19) संकटाचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन अहोरात्र झटत आहेत. जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग अलर्टवर असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यंत्रणेबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी यात मोठी आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच आपण या संकटावर मात करू शकतो. त्यामुळे 'कोरोनामुक्त' जिल्ह्याच्या संकल्पासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे वने व भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी निवडक अधिका-यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे उपस्थित होते.
            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखायचा असेल तर मानवी साखळी तोडणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, यासाठी शासन आणि प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहे. या निर्देशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवावा. वडकी, शिरपूर, देवगाव, वटफळी, बोदेगाव, मानोरा, दिग्रस, पुसद रोड, उमरखेड (नांदेड रोड), घाटंजीकडून किनवट रोड, पिंपळखुटी, वरोरा रोड, नागपूर रोड आदी सीमेवर येणा-या जाणा-या वाहनांची कडक तपासणी करावी. जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक करणा-या ट्रकमधून 10-15 जण येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मालवाहतूक ट्रकमधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याकडे पोलिस विभागाने गांभिर्याने लक्ष द्यावे.
            असाच प्रकार रुग्णवाहिकेच्या बाबतीतही घडत आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेमध्ये केवळ रुग्ण आणि त्यासंबंधित एक-दोन व्यक्ति असल्या पाहिजे. याबाबतही पोलिसांनी तपासणी करून सदर रुग्णवाहिका त्वरीत रवाना करावी. सध्यास्थितीत किराणा, भाजीपाला, फळे, पेट्रोलपंप आदी विक्रीकरीता सकाळी 6 ते दुपारी 3 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र ही वेळ आणखी कमी करता येते का, याबाबत प्रशासनाने नियोजन करून त्याबाबतचा अहवाल आपल्याकडे सादर करावा. जेणेकरून ही बाब तपासून निर्णय घेता येईल.
            संचारबंदीच्या काळात अनावश्यक फिरणा-या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. तसेच आरोग्याचा सर्वे करणा-या टीमसोबत वाद घालणा-या व्यक्तिंवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. सद्यस्थितीत सर्व धर्माचे प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही एकत्र येऊन पुजा-अर्चा करण्यास प्रतिबंध आहे. मात्र तरीसुध्दा जास्त जागा असलेल्या घरांमध्ये नागरिक एकत्र येऊन पूजा करीत असल्यास व त्याबाबत तक्रार प्राप्त झाली तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.  जीवनावश्यक वस्तुंची विक्री चढ्या भावाने होऊ देऊ नये. असे आढळल्यास संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्यात येईल. स्वस्त धान्य दुकानदारानेसुध्दा शासनाच्या निर्देशानुसारच धान्य वितरीत करून संबंधितांना बील द्यावे. धान्याची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आल्यास जीवनावश्यक वस्तु नियंत्रण कायद्यानुसार दुकानदारावर कारवाई करण्यात येईल. पोलिस विभागाचे शहरातील प्रत्येक चौकात बॅरीकेटींग लावावे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड – 19 संदर्भात वॉररुम तयार करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिका-यांना दिले.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी