पॉझेटिव्ह असलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह




v आयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्हसह 19 जण भरती
यवतमाळ, दि. 21 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या सहा वर आली आहे. आतापर्यंत एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरीत सहा रुग्णांनासुध्दा निगेटिव्ह करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. 
सोमवारपर्यंत आयसोलेशन वॉर्डात एकूण सात पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी एका रुग्णाचा दुसरा आणि तिसरा निगेटिव्ह रिपोर्ट रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला. या रुग्णाला सुट्टी देण्यात आली असून त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेआहे. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये सहा पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 19 जण भरती आहे. गत 24 तासात तीन जण भरती करण्यात आले आहे.मंगळवारी एकूण 19 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून 20 जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 108 जण तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात एकूण 793 जण आहेत.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पुढील 14 दिवस हे युध्द आपल्याला लढायचे आहे. यात नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, घराच्या बाहेर न पडणे, मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे आदी सुचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले तर आपला जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख लोकांनी ‘Aarogya Setu’ हे ॲप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले हे ॲप ॲन्डड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे चार प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत की असुरक्षित, हे या ॲपमध्ये कळते. तसेच देशातील कोरानाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या ॲपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप त्वरीत डाऊनलोड करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी