यवतमाळ जिल्ह्यातील बँकांचे व्यवहार आता सकाळी आठ ते बारा


       यवतमाळ, दि.10 :  जिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाती उघडलेल्या महिला खातेदारांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, मे व जून महिन्याच्या रकमा जमा करण्याचे काम बँकेमार्फत सुरू आहे. सदर रक्कम काढण्याकरिता नागरिकांची गर्दी बँकेत वाढत असून संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील बँकांचे व्यवहार सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे.
जिल्ह्यात नुकतेच 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या व्यवहाराच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले असून बँकेची वेळ आता सकाळी आठ ते दुपारी बारा अशी राहणार आहे. सदर बदल पुढील आदेशापर्यंत लागू राहील. या आदेशानुसार सर्व बँक व्यवस्थापकांना सुचित करण्यात आले आहे की, प्रत्येक बँकेद्वारे पैसे काढणे, पैसे टाकणे, पैसे पाठवणे, तसेच स्वतःच्या खात्यातील किमान रकमा तपासणे व काढणे इत्यादी सेवा प्रत्येक ग्राहकाला पुरविण्यात याव्यात. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सेवा उपलब्ध करून देण्यात येऊ नये.
ही सेवा पुरवताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. यात सोशल डिस्टन्सिंग,  बँकेमध्ये हात स्वच्छ धुण्याकरिता हँडवॉश, सॅनिटायझर इत्यादी साहित्य ठेवावे. ही जबाबदारी बँक व्यवस्थापकाची राहील, असेही आदेशात नमूद आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग  नियंत्रण अधिनियम 1890, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर नियम व कायदे यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी