जिल्ह्यातील 19 लक्ष नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ - पालकमंत्री संजय राठोड

                             
                               
v अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश
v एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अतिरिक्त वाटप
यवतमाळ दि.  2 : कोरोना विषाणु (कोव्हिड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम 144 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. याची झळ सर्वांनाच बसत आहे. मात्र रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणा-या गरीब आणि गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 19 लक्ष 28 हजार 953 नागरिकांना प्रतिमहिना प्रतिव्यक्ति पाच किलो अतिरक्त तांदूळ देण्यात येणार आहे. हे वाटप नियमित धान्याच्या व्यतिरिक्त असून एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने तांदूळ देण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत तांदळाचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 1 लक्ष 22 हजार 622 असून सदस्य संख्या 5 लक्ष 28 हजार 623 आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची संख्या 3 लक्ष 13 हजार 219 आहे. यातील सदस्य संख्या 14 लक्ष 330 आहे. अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत एकूण 19 लक्ष 28 हजार 953 लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रति माह असे तीन महिने मोफत तांदूळ देण्यात येईल. यासाठी अंत्योदय अंतर्गत मा‍सिक नियतन 2643 मेट्रीक टन तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत मासिक नियतन 7002 मेट्रीक टन तांदूळ लागणार आहे. तीन महिन्यात दोन्ही योजनेंतर्गत एकूण 28935 मेट्रीक टन तांदूळ वाटण्यात येणार आहे. या मालाची उचल सुरू असून स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मोफत तांदळाचे वाटप करतांना त्या लाभार्थ्यांनी नियमित अन्नधान्याची उचल केली आहे की नाही, याची खतरजमा करण्यात येईल. लोकांना मोफत तांदूळ वाटण्यासाठी विहित कालावधीत तांदळाची उचल होणे गरजेचे आहे. यात कसूर केल्यास संबंधित अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासन आदेशात म्हटले आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घ्यावे. तसेच संयुक्तपणे तांदळाचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच उचल करावी. तांदळाचे वितरण करतांना रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करणे अनिवार्य आहे, असे आदेशात नमुद आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी