दोन दिवसांत चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई


v एकाचे प्राधिकारपत्र रद्द तर तिघांचे निलंबित
यवतमाळ, दि. 22 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर स्वस्त धान्य दुकानांमधून गरजू व गरीब नागरिकांना नियमानुसार धान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, शासकीय दरापेक्षा जास्त भावाने धान्य देणे, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना नियमानुसार धान्य वाटप न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील चार स्वस्त धान्य दुकानावर कारवाई केली आहे. यात एका स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द तर इतर तिन जणांचे निलंबित केले आहे.
उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानदार डी.वाय. माळवे यांच्या दुकानाची तपासणी केली असता दुकानात फलक न लावणे, तपासणीवेळी 423  किलो गहू, 368 किलो तांदूळ, 4 किलो तूरडाळ, 3 किलो साखरेची असलेली तूट (बाजारभावाने किंमत 24176 रुपये), दुकानाच्या दर्शनी भागात योजनानिहाय सर्व योजनांचे धान्याच्या मुल्यमापनाबाबत फलक न लावणे, योजनेनिहाय अन्नधान्य वाटपाचे फलक न लावणे, शिधापत्रिकाधारकांनी तक्रार कोणाकडे करावी याबाबत माहिती व शासनाचा टोल फ्री क्रमांक न लावणे, विक्री नोंदवही, स्टॉक नोंदवही, व्हीजीट नोंदवही, तक्रार नोंदवही असे कोणतेच अभिलेख तपासणीकरीता उपलब्ध करून न देणे आदी कारणावरून उमरखेड येथील डी.वाय. माळवे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच येथील शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तुंचे वितरण नियमितरित्या होण्याच्या दृष्टीने  उमरखेड तहसीलदार यांनी सर्व शिधापत्रिका नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानास जोडून दिल्या आहेत.
कळंब तालुक्यातील मौजा सावरगाव येथील रास्त भाव धान्य दुकानदार अशोक वडेरा हे गत अडीच वर्षांपासून वर्षांपासून दोन व्यक्तिंचे 10 किलो धान्य कमी देत असल्याची तक्रार रमेश कोहळे, रा. पिंपळखुटी यांनी केल्यावर या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने वडेरा यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील मौजा राजूर येथील स्वस्त धान्य दुकानदार मारोती मानकर हे शिधापत्रिकाधारकांना शासकीय दरापेक्षा जास्त भावाने धान्य देणे तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य वाटप न करणे याबाबत तपासणीत आढळून आल्याने त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे. उमरखेड तालुक्यातील जनुना येथील स्वस्त धान्य दुकानदार हरी बुरकुले यांनीसुध्दा धान्यवाटपात अनियमितता केल्याने तसेच तपासणीदरम्यान कोणतेही कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.
वरील स्वस्त धान्य दुकानदारांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तु (वितरणाचे विनियमन) 1975 व त्याअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे सिध्द होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदर दुकानदारांवर कारवाई केली आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी