शेतमाल खरेदीकरीता तात्पुरत्या स्वरुपात खरेदी केंद्र उपलब्ध करून द्या


v पालकमंत्र्यांचे सहकार व पणन मंत्र्यांना पत्र
यवतमाळ, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊन रोज जास्तीत जास्त शेतक-यांचा शेतमाल खरेदी होण्यासाठी तालुका स्तरावर तात्पुरत्या स्वरुपात खरेदी केंद्र (यात प्रामुख्याने बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था) उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सहकार व पणन मंत्री श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
            संचारबंदी लागु केल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेतमालाची खरेदीसुद्धा बंद झाली होती. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून बऱ्याच शेतकऱ्यांना घरखर्च भागवणेसुद्धा कठीण जात आहे.
सद्यस्थितीत शेतक-यांकडील हरभरा, तूर व कापुस या शेतमालाची नाफेड आणि सीसीआय यांना विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. आजमितीस शेतकऱ्यांचा हरभरा, तूर, कापूस या शेतमालाची शासकीय खरेदी केंद्रामार्फत अत्यल्प शेतकऱ्यांकडून खरेदी सुरु झालेली आहे. परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरीता " सोशल डिस्टन्स ' पाळणे आवश्यक असल्यामूळे नगण्य शेतमालाची खरेदी सुरु आहे. या गतीने खरेदी चालु राहिल्यास जून महिन्यापर्यत शेतकऱ्यांचा ५० टक्के मालसुद्धा खरेदी करणे शक्य नाही. तसेच हरभरा, तूर व कापूस हे शेतमाल जून महिन्यात पावसाळा सुरु होईपर्यत शेतकऱ्यांकडे राहिल्यास योग्य साठवणुकीच्या जागेअभावी कीड लागण्याची शक्यता आहे. तसेच त्याची प्रत खालावून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 खरीप हंगामाची सुरुवात जून महिण्यापासून होत असल्यामूळे व पेरणीचा कालावधी अत्यंत महत्वाचा असल्यामूळे यापुर्वीच शेतमाल विक्री होवुन शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास त्यांना खरीप हंगामातील पेरणीकरीता आवश्यक दराने खरेदी करणे शक्य होणार नाही. त्यामूळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडणार आहेत. या सर्व बाबींचा खाजगी व्यापारी गैरफायदा घेऊन शेतमाल अत्यंत कमी दराने खरेदी करत आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सद्यस्थितीत सर्वच शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आलेली आहेत. त्यामूळे तालुका स्तरावरून शेतमाल खरेदीकरीता सोईच्या असणाऱ्या शाळा, महाविद्यालये किंवा इतर शासकीय संस्थांची निवड करुन त्या ठिकाणी शासकीय शेतमाल खरेदी केंद्राची संख्या वाढवल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल शासनास खरेदी करता येईल. त्यादृष्टिने सर्व संबंधिताना पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध करुन खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत. जेणेकरुन शेतकऱ्यांनासुद्धा या आर्थिक संकटातुन सावरण्यास मदत होईल, या आशयाचे पत्र पालकमंत्र्यांनी सहकार व पणन मंत्र्यांना लिहिले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी