जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक


v व्यापारी संघटना, केमिस्ट्-ड्रगिस्ट असोसिएशन आदींचा समावेश
            यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यात व्यापारी संघटना, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, कृषी केंद्र संचालक संघटना आदींचा समावेशा होता. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी आदी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, किराणा माल, औषधी व इतर अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यास अडचण असल्यास संबंधितांनी ट्रकवर दर्शनी भागात चिठ्ठी लावावी. यावर ट्रक कुठे जात आहे व कुठून परत येणार आहे तसेच ट्रकमध्ये कोणत्या वस्तुंची ने-आण होत आहे, आदी महत्वाच्या बाबी समोर चिठ्ठीवर लावल्यास वाहतुकीची अडचण होणार नाही. अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करणा-या ट्रकला पोलिस अडविणार नाही. जिल्ह्यात औषधी व इतर अनुषंगीक साहित्याचा साठा मुबलक आहे. मात्र काही औषधी व गोळ्यांचा माल जिल्ह्यात भिवंडी व पुण्यावरून येतो. मधुमेह व सिकलसेल आजारासंबंधित औषधांचा मुबलक साठा ठेवण्यात यावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
            कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन झालेच पाहिजे या दृष्टीने कडक कार्यवाही करावी. याबाबत सुचना दर्शनी भागावर लावाव्यात. लिलाव झाल्यानंतर रिटेलर तेथेच दुकान लावून माल विकणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सिलिंडर बुकींग व वाटप याबाबत संबंधित एजंन्सीने त्यांच्या स्तरावर आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. हल्दीराम किंवा बिकानेर या कंपन्यांनी पुरविलेला पॅकींग फूड स्टॉक जवळपास संपत आला आहे. तसेच रवा, मेवा, आटा या वस्तुंचा नियमित पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागपूरवरून येणा-या या मालाच्या पुरवठ्याबाबत कंपन्यांना सुचना देण्यात येईल. बियाणे, खते याबाबतची उपलब्धता व लॉकडाऊमध्ये येणा-या अडचणी त्वरीत निदर्शनास आणून द्याव्यात, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
            लॉकडाऊनपूर्वी व लॉकडाऊननंतर मार्च व एप्रिल महिन्याचा किराणा माल होलसेलर्सने भरून ठेवला आहे. तसेच खाद्यतेलाचा भरपूर साठा आहे. गहू, तांदूळ व किराणा मालसुध्दा मुबलक प्रमाणात आहे. यात कोणतीही अडचण नाही, असे किराणा असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर किराणा दुकान असोसिएशनच्या प्रतिनिधींचा व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करावा व पुरवठ्याशी संबंधित प्राप्त होणा-या सुचना वेळोवेळी या ग्रुपवर टाकाव्यात. जेणेकरून किराणा दुकानदारांना सोयीचे होईल, अशी सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. भराडी यांनी केली.  
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी