मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना अकुशल कामे उपलब्ध करून द्या



v  सीईओंचे ग्रामपंचातींना आदेश
यवतमाळ, दि. 7 : कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण राज्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा फटका मजूर वर्गाला बसला असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक स्वरुपाची कामे सुरू करावी. तसेच संचारबंदीचा भंग न होता मजुरांच्या मागणीप्रमाणे त्यांना अकुशल काम उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिका-यांना दिल्या आहेत.
पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर मजुरांच्या मागणीप्रमाणे अकुशल कामे उपलब्ध करून देऊन त्यांनी केलेल्या कामाची मजुरी विहित कालावधीत अदा करण्याची कार्यवाही त्वरीत करावी. तसेच कामे सुरू करण्याबाबत संबंधित ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर तसेच इतर संबंधितांना आवश्यक त्या सुचना निर्गमित कराव्यात. मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना मजुरी उपलब्ध करून देत असतांना शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या 23 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांना द्यावयाचा अकुशल मजुरीचा दर महाराष्ट्रासाठी 1 एप्रिल 2020 पासून 238 रुपये प्रतिदिन इतका निश्चित केला आहे.  सदर मजुरी दर लागू करण्याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावरून सुचना देण्यात याव्या. त्याकरीता शेल्पवरील कामांची अंदाजपत्रके नवीन दरानुसार सुधारीत करण्यात यावी. तसेच नवीन कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करतांना सन 2020 – 21 या आर्थिक वर्षाकरीता निश्चित केलेल्या मजुरीच्या दरपत्रकानुसार प्राकलन तयार करण्यात यावे, अशाही सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी