आतापर्यंत जिल्हाधिका-यांनी केले 15 मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द



यवतमाळ, दि. 29 : कोरोना विषाणु संसर्गामुळे आपात्कालीन आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा 1897, संचारबंदी  व सर्वत्र लॉकडाऊन असतांना शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या 15 दुकानांचे परवाने आतापर्यंत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहे. यात सहा बार ॲन्ड रेस्टॉरंट, पाच देशी दारुची दुकाने, दोन वाईन शॉप, एक बिअर शॉपी आणि विदेशी दारुचे होलसेल असलेल्या एका गोदामाचा यात समावेश आहे.
कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन सुरू आहे. सोबतच  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य विक्री करणारे चार देशी दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हा नोंद केला आहे. यात पुसद येथील सतीश भगवान यांच्या मालकीचे के.के.ट्रेडर्स, पुसद येथीलच अरविंद चव्हाण आणि मल्लेशाम पल्लेवार यांच्या मालकीचे तिरुपती ट्रेडर्स, यवतमाळ येथील टी.एस.घलवार यांचे आणि मुकुटबन येथील एम.एन नक्षिणे यांच्या मालकीचे देशी दारुच्या दुकानांचा समावेश आहे. या चारही दुकानांचे परवाने जिल्हाधिका-यांनी कायमस्वरुपी रद्द केले आहे. यापूर्वीसुध्दा 11 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली अस्तित्वात आहेत. त्यामुळे पूर्णपणे मद्यविक्री व मद्य वाहतूक बंद असताना अनुज्ञप्ती धारकाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे तसेच केंद्र शासनाने आदेशित केलेल्या संपूर्ण लॉकडाउनचे उल्लंघन केले आहे. तसेच मुंबई विदेशी मद्यनियम 1953 चे देखील उल्लंघन करण्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी