मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम

 

v ‘उमेदच्या’ बचत गटाच्या महिलांनी तयार केले पाच लाख मास्क
यवतमाळ, दि. 28 : सद्यस्थितीत कोरोना विषाणुचे संकट सर्व जगावर पसरले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नागरिकांनी ‘मास्क’ वापरणे हाच आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून यवतमाळ जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) च्या बचत गटातील महिला पुढे सरसावल्या. नागरिकांसाठी मास्क निर्मितीचे काम या महिलांनी हाती घेतले आणि पाहता पाहता मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम ठरला. उमेदच्या महिलांनी एक, दोन नव्हे तब्बल 5 लाख 15 हजार 775 मास्क एका महिन्याच्या काळात तयार केले.  
यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 1422 उमेदच्या महिला बचत गटांनी मास्क शिवण्याचे काम हाती घेतले. या कामासाठी जिल्ह्यातून बचत गटाच्या 2466 महिला पुढे आल्या. या महिलांनी 5 लक्ष 15 हजार 775 मास्कची निर्मिती करून एक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे संकटाच्या या काळात ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेतून त्यांनी मास्कची निर्मिती केली. सामाजिक जाणीव लक्षात ठेवून गावातील नागरिकांना, गावातील अपंग, ज्येष्ठ नागरिक व गरजू लोकांना 57403 मास्क मोफतसुध्दा वाटले. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर 3 लाख 40 हजार 648 मास्क तयार करून दिले. तयार केलेल्या मास्कपैकी वैद्यकीय कर्मचारी, ग्रामपंचायत, किरकोळ विक्री, सामाजिक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींना मास्कची विक्रीसुध्दा केली. विक्री करण्यात आलेल्या मास्कची संख्या 1 लाख 8 हजार 852 असून यातून बचत गटाच्या सर्व महिलांना 16 लक्ष 65 हजार 369 रुपयांची मिळकत झाली आहे. 
सर्वात जास्त मास्कची निर्मिती यवतमाळ तालुक्यात झाली असून तालुक्यातील 82 बचत गटाच्या 180 महिलांनी 58350 मास्क तयार केले. यानंतर उमरखेड तालुक्यात 81 बचत गटाच्या 117 महिलांनी 54400 मास्क, घाटंजी तालुक्यात 62 बचत गटाच्या 200 महिलांनी 51600 मास्क, वणी येथील 103 बचत गटाच्या 118 महिलांनी 35404 मास्क आणि केळापूर तालुक्यातील 38 बचत गटाच्या 88 महिलांनी 34160 मास्क तयार केले. याशिवाय सर्वच तालुक्यातील उमेदच्या बचत गटाच्या महिलांनी मास्क निर्मितीत आपले योगदान दिले आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी यांचे वेळोवेळी या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन मिळाले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी