पाच मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द


v दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटचा समावेश
v जिल्हाधिका-यांच्या सुचनेवरून कारवाई
यवतमाळ, दि. 24 : साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणा-या दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटसह एकूण पाच मद्यविक्री दुकानांचे परवाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी  कायमस्वरुपी रद्द केले आहे.
कोरोना विषाणुचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन सुरू आहे. सोबतच  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मद्यविक्री व त्याची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र तरीसुध्दा या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्य विक्री करणारे दोन देशी दारूचे दुकान, बीअर शॉपी आणि दोन बार ॲन्ड रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हा नोंद केला आहे.

यात नेर येथील ऋतुराज राजेंद्र महाजन याच्या मालकीचे साई रेस्टॉरंट ॲन्ड बार, पाटणबोरी (ता. केळपूर) येथील शंकर महादेव नालमवार याच्या मालकीचे श्री अनुप रेस्टॉरंट ॲन्ड बार, पाटणबोरी येथीलच पद्मा पद्माकर पतकी याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान, कुंभा (ता. मारेगाव) येथील अरुण पंचमलाल जयस्वाल याच्या मालकीचे देशी दारुचे दुकान आणि पुसद येथील विटाळा वॉर्डातील पंकज सखाराम राठोड याच्या मालकीचे कमल बीअर शॉपी या दुकानांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली अस्तित्वात आहेत. त्यामुळे पूर्णपणे मद्यविक्री व मद्य वाहतूक बंद असताना अनुज्ञप्ती धारकाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे तसेच केंद्र शासनाने आदेशित केलेल्या संपूर्ण लॉकडाउनचे उल्लंघन केले आहे.
तसेच या प्रकरणातील आरोपींनी गैरमार्गाने आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याचे व जिल्हाधिका-यांनी पारीत केलेल्या आदेशाचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन झाले आहे. तसेच मुंबई विदेशी मद्यनियम 1953 चे देखील उल्लंघन करण्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून वरील बार ॲन्ड रेस्टॉरंटआणि मद्यविक्री दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी