पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात गावखेड्यात भोजनाची व्यवस्था




v सर्व तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरू
यवतमाळ, दि. 6 : कोरोना विषाणु संसर्गामुळे राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम 144 ची अंमलबजावणी सुरू आहे. संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे गरीब व गरजू लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाची समस्या त्यांच्यासमोर आवासून उभी ठाकली आहे. या परिस्थितीत गरीब व गरजू लोकांना जेवण मिळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात गावखेड्यात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
संचारबंदीमुळे हॉटेल्स, खानावळी, ढाबे सर्व बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना जेवणाची सोय व्हावी म्हणून राज्य शासनाने शिवभोजन थाळी पाच रुपयांत उपलब्ध करून दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्व तालुक्यात शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यवतमाळ शहरात तीन केंद्रात प्रत्येकी 200 थाळी गरीब व गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर उर्वरीत 15 तालुक्यात 1350 थाळी दररोज उपलब्ध होत आहे. दोन्ही मिळून एकूण 1950 शिवभोजन थाळ्या जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
याशिवाय पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सामाजिक संघटना, पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावखेड्यात एकाच ठिकाणी जेवण बनविण्यात येत असून नागरिकांना जागेवरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सामाजिक संघटनांकडून 25 हजार भोजन पॅकेट्स वाटप : गत पाच दिवसात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून 25 हजार 700 भोजन पॅकेट्स वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भोजन वाटप करणा-या सामाजिक संघटनांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांची जेवणाची सोय करण्यात येत आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी