हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतली बैठक



v शेतक-यांना मोठा दिलासा
यवतमाळ, दि. 23 : कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे 21 मार्च रोजी जिल्ह्यातील शासकीय हमीभावानुसार कापूस, तूर, चना खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणी आला. या अडचणीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हमी भावानुसार खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह सीसीआय, पणन महासंघाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुर करण्याची आवश्यकता असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करून हमी भावानुसार शेतक-यांकडून धान्य खरेदी करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच पालकमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात शासकीय हमीभावानुसार व्हीसीएमएफ व जिल्हा मार्केटिंग अधिकारी मार्फत तूर व चना यांची खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. जिल्ह्यात 16 खरेदी केंद्र असून दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगाव या तालुक्यात निधी व गोडावून अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. परंतु पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रावर तूर व चना खरेदी सुरू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खरेदी केंद्रावर कमाल 20 गाड्यांना परवानगी असेल तसेच खरेदी प्रक्रिया करतेवेळी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्कची सुविधा ठेवणे गरजेचे आहे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
जिल्ह्यात कॉटन फेडरेशनचे नऊ खरेदी केंद्र असून आतापर्यंत या केंद्रावर 6 लक्ष 70 हजार 722 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. सीसीआयच्या दहा खरेदी केंद्रावर 16 लक्ष 75 हजार 429 क्विंटल कापूस, व्यापा-यांकडून 10 लक्ष 83 हजार 739 क्विंटल आणि खाजगी बाजार समितीमार्फत 10 लक्ष 54 हजार 295 क्विंटल असा एकूण 44 लक्ष 84 हजार 176 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिका-याकडून 19095 क्विंटल तूर, 1363 क्विंटल चना तर व्हीसीएमएम मार्फत 19588 क्विंटल तूर आणि 5030 क्विंटल चना खरेदी करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले.  
०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी