पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार शेतमालाच्या खरेदी विक्रीला सुरुवात


यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय हमीभावानुसार व्ही.सी.एम.एफ. व डी.एम.ओ. मार्फत तूर व चना यांची खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात शेतमालाच्या खरेदी विक्रीला सुरवात करण्यात आली आहे. शेतक-यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात 16 खरेदी केंद्र असून त्यापैकी दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगांव या तालुक्यामध्ये निधी व गोडावून अभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. त्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रावर तूर व चना खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी खाजगी गोडावून ताब्यात घेतलेत व शेतकऱ्याकडून खरेदी माल गोडावून मध्ये ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग उद्योगातील कामगार कोरोनामुळे गावाकडे गेले होते. परंतु त्यांना परत कामावर रुजू करून घेण्यासाठी कोविड – 19 च्य एसओपी (निकषानुसार) विशेष काळजी घेवून जिनिंग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापूस खरेदीसुध्दा सुरु झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे, मात्र कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही अशा शेतक-यांना पुढील पीककर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पालकमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने दिनांक 27 एप्रिलच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारीत करून या शेतकऱ्यांना विशेष सुट देवून पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत आरबीआयकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरविले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तूर, चना व कापसाची नोंद केली असेल त्या सर्वांचा माल लॉकडावूनचे निर्बंध शिथिल झाल्यावर खरेदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खाजगी बाजार समित्या व खाजगी व्यापारी यांच्याकडे नॉन एफएक्यू कापूस खरेदी सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कोविड – 19 च्या नियमांचे पालन करून विक्री करावा. तसेच शेतक-यांची चिंता करू नये. शेतक-यांचा शेतमाल खरेदी ही शासनाची जबाबदारी आहे. फक्त कोरोनाच्या या परिस्थितीत थोडा धीर धरावो, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 50690.84 क्विंटल तूर, 10425.62 क्विंटल चना आणि 4506573 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तूर व चनाची खरेदी डीएमओ आणि व्हीसीएमएफ कडून तर कापसाची खरेदी सीसीआय, फेडरेशन, व्यापारी आणि खाजगी बाजाराकडून करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे. 
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी