शेतक-यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते उपलब्ध करून द्या - पालकमंत्री संजय राठोड




v कृषी निविष्ठांची नमुने तपासणी प्रयोगशाळा यवतमाळ करण्याचे नियोजन
v जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
यवतमाळ, दि. 24 : शेतक-याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला आगामी काही दिवसातच सुरूवात होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा आर्थिक डोलारा खरीपावरच अवलंबून असल्यामुळे आगामी हंगामासाठी शेतक-यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते उपलब्ध करून द्या, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, दुष्यंत चतुर्वेदी, विधानसभा सदस्य डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू असून त्याच्या घरात आनंद व समृध्दीचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबध्द आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील 95 टक्के शेतकरी हे पारंपरिक पध्दतीने शेती करतात. कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आदी पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. येणा-या हंगामात उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने कसोशीने प्रयत्न करावे. त्यासाठी शेतक-यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते व किटकनाशके त्वरीत उपलब्ध करून द्या. या बाबींचा तुटवडा जाणवू देऊ नका. जिल्ह्यात बियाणे व खतांचा रॅक पॉईंट वाढवा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोकरा) शेतक-यांना लाभ द्या. कृषी विभागाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या विविध योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यकांना प्रशिक्षण द्यावे.
कृषी विभागातर्फे विकसीत करण्यात आलेल्या ॲपमध्ये शेतक-यांच्या यशोगाथा, त्यांचे अनुभव, फळबागपध्दती लागवड, आदींचा समावेश करावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतक-यांच्या कुटुंबाला त्वरीत मिळाला पाहिजे. या योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढा. लाभ देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. जमिनीचे नियमित परीक्षण, तपासणी होणे गरजेचे आहे. येणा-या हंगामात किटकनाशक विषबाधा होऊ नये, यासाठी आतापासूनच संरक्षण किटचे नियोजन करा. तसेच शेतक-यांसाठी तालुका स्तरावर हेल्पलाईन क्रमांक व तक्रार निवारण केंद्र सुरू करा. पीक कर्जवाटपाबाबत दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे बँकांनी कर्जवाटप करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात चालू वर्षाकरीता 15 हजार शेततळे तसेच 80 टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गत दहा दिवसात 3852 शेतका-यांना 35 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. पुढील आठवड्यापर्यंत हा आकडा 100 कोटीवर जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी गत पाच वर्षातील क्षेत्र व उत्पादकता, हवामान पीक पध्दती, बियाणे व खतांचा पुरवठा व विक्री, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, खरीप कर्ज वाटप, कापूस खरेदी केंद्र आदींचा त्यांनी आढावा घेतला.
आता यवतमाळातच होणार कृषी निविष्ठांची नमुने तपासणी
लागवड क्षेत्रानुसार उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी निविष्ठांची नमुने तपासणी अत्यंत महत्वाची बाब आहे. आतापर्यंत हे नमुने तपासणीकरीता इतरत्र जात होते. मात्र आता बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषी निविष्ठांची नमुने तपासणी प्रयोगशाळा यवतमाळमध्ये करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. त्यासाठी रितसर अहवाल तयार करावा. जिल्हा नियोजन समितीमधून प्रयोगशाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.  
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी