प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची सीमा बंद


यवतमाळ, दि. 27 : यवतमाळ शहरातील भाग क्र.10 आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे व पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्याभागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून या भागाच्या 3 कि.मी. परिघाच्या सीमा बंद करण्यात आल्या. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात एकूण सहा प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. यापैकी तीन क्षेत्र यवतमाळ शहरातील आहे. त्यानुसार कोराना विषाणुद्वारे बाधित व्यक्ती किंवा समुदायाच्या केंद्रबिंदुपासून 3 किलोमिटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करण्याबाबत निर्देशित केले आहे.
          त्यानुसार यवतमाळ शहरातील इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये यादृष्टीने पोलिस अधिक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार यवतमाळ शहरातील चापनवाडी, तारपूरा, शिंदेनगर, आठवडी बाजार, अलकबीर नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शुभंकर रोड, सुदर्शन नगर या भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागातील 3 कि.मी. परिघीय क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे.
या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस, निर्गमित करून सदर परवाना, पासेस धारकांची यादी संबंधीत पोलीस स्टेशनला तात्काळ द्यावी. परवाना, पासेस धारकांना पोलिसांनी नेमूण दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांच्या मार्फत करावी, असेही आदेशात नमुद आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तिंवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.डी. सिंह यांनी कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी