20 एप्रिलपासून लॉकडाऊन काळात काही बाबींवर शिथिलता


v उद्योग, बांधकाम, मनरेगा, जलसंधारण आदी कामे अटीसह सुरू होणार
v नागरिकांनी सुचनांचे पालन करणे बंधनकारक
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला असला तरी शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी खालील काही बाबींवर पुन्हा शिथिलता दिली असून काहींवर मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आदेशीत केले आहे.
   आरोग्य सेवा अंतर्गत आयुषसह सर्व आरोग्यसेवा रुग्‍णालये, नर्सिग होम, क्लिनिक, टेलिमेडीसीन्‍स सुविधा, डिस्‍पेन्‍सरीज केमिस्ट, औषधी दुकाने (जन औषधी केंद्र आणि वैद्यकीय साहित्‍यांचे दुकानासह), वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्रे, कोविड-19 च्‍या संबंधाने औषध व वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, संस्था, पशुवैद्यकीय रुग्‍णालये, दवाखाने, क्लिनिक, पॅथालॉजी लॅब, लस व औषधांची विक्री व पुरवठा, अधिकृत खाजगी आस्‍थापने जी कोविड-19 च्‍या आवश्‍यकतेच्‍या सेवांच्‍या तरतुदीसाठी किंवा हा आजार रोखण्‍याच्‍या प्रयत्‍नांना समर्थन देतात, ज्‍यात होमकेअर प्रदाते, डायग्‍नोस्‍टीक रुग्‍णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, तसेच सेवा देणारे रुग्‍णालये, औषधे, फार्माक्स्‍युटिकल्‍स वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय ऑक्‍सीजन तसेच त्‍यांचे पॅकेजिंग साहित्य, कच्‍चा माल आणि मध्‍यवर्ती घटकांचे उत्‍पादन युनिट, रुग्‍णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय/आरोग्‍याच्‍या पायाभूत सुविधांचे बांधकाम, वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय व्‍यक्‍ती, वैज्ञानिक, परिचारिका, पॅरामेडीकल स्‍टॉफ, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, दाई आणि इतर आरोग्‍य विषयक सेवा, (रुग्णवाहिकेसह) सुरू राहतील.
    कृषी व कृषी संबंधित कामाअंतर्गत शेती व फळबागा संबंधातील सर्व कामे पुर्णपणे कार्यरत राहतील. शेतामध्ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा राहील. कृषी उत्पादने खरेदी करणा-या यंत्रणा तसेच शेतमालांची उद्योगाद्वारे, शेतक-याव्‍दारे, शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाव्‍दारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणा-या यंत्रणांची कामे सुरु राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्‍यात येणा-या मंडी किंवा महाराष्‍ट्र शासनाने अधिसुचित केलेल्या मंडी सुरु राहतील. शेतीविषय यंत्राची व त्यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्ती करणारे दुकाने व त्यांचा पुरवठा साखळीसह सुरु राहील.
शेतीकरीता उपयोगात येणारे भाडे तत्वावरील अवजारे पुरवठा करणारे केंद्र, रासायनिक खते, किटकनाशके, बि- बियाणे यांचे उत्पादन, वितरण व किरकोळ विक्री सुरु राहील. शेतमालाची काढणी व पेरणी करणा-या मशीन्स जसे कंबाईंड हार्वेस्‍टर आणि इतर कृषि अवजाराची वाहतूक सुरु राहील. मासेमारी व अनुषंगिक व्यवसायाकरीता वाहतूकीची मुभा राहील. तसेच पेसा, नॉन-पेसा आणि एफआरए क्षेत्रात गौण वन उत्पादन उपक्रम जसे संग्रहण, प्रक्रिया, वाहतूक व विक्री तसेच वन व वन क्षेत्राव्यतीरिक्त क्षेत्रातून तेंदुपानाचे संकलन केंद्रे व त्याची गोदाम पावेतो वाहतुक करणे. जंगलातील आग टाळण्यासाठी जंगलात पडून असलेल्या इमारती लाकूडांची तात्पुरती विक्री, डेपोमध्ये संकलन आणि वाहतूक करता येईल. पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित दुध संकलन करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे वितरण व विक्री, पशुपालन, कुकुटपालन व अनुषंगिक कामे, जनावरांच्या छावण्या व गोशाळा सुरु राहतील.
   आर्थिक बाबीशी संबंधित बॅंका, एटीएम, बॅंकेसाठी आवश्‍यक आय.टी. सेवा, बॅंकींग संवादक/ प्रतिनिधी सेवा, इत्‍यादी बॅंकींग सेवा नेमून दिलेल्या वेळेनूसार बॅंक शाखा सुरु राहतील. स्थानिक प्रशासनाने बँकेमध्ये सुरक्षा रक्षक नेमावे. तसेच बॅंक कर्मचारी व ग्राहक यांच्याकडून सामाजिक अंतर (Social Distancing), तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल, याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बँकिंग वेळा सकाळी 8 ते 12 राहील. सहकारी पतसंस्था देखील सुरू राहतील.
      मनरेगाशी संबंधीत कामे, मनरेगामधील सिंचन व जलसंधारणाची कामे, पाटबंधारे आणि जनसंधारण क्षेत्रातील इतर केंद्र  आणि राज्य योजनांतर्गत मनरेगाची कामे सुरू राहतील. सार्वजनिक सुविधेअंतर्गत पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी.गॅस यांची वाहतूक, वितरण, साठवण व किरकोळ विक्री, विज निर्मिती, विज पारेषण व विज वितरण, पोस्‍ट ऑफीस संबधित सर्व सेवा, पाणी, स्‍वच्‍छता, घनकचरा व्‍यवस्‍थापन बाबतची कार्यवाही याबाबतच्‍या सुविधा नगरपरिषद स्‍तरावर सुरु राहतील. तसेच दुरसंचार व इंटरनेट या सेवा सुरु राहतील. याशिवाय नैसर्गिक आपत्तींशी संबंधीत सर्व मदत उपाय विशेषत: टंचाई, दुष्काळ तसेच टँकरने पाणीपुरवठा आणि वाहनाने चारा पुरवठा करणे ही कामे सुरू राहतील.
 वाहतूक करणारी ट्रक त्यासोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असणे आवश्यक आहे. मालवाहतूकीसाठी जाणारे खाली ट्रक किंवा मालवाहतूक करुन परत जाणारे खाली ट्रक यांना सुध्‍दा परवानगी राहील. वाहनचालक यांनी वाहन चालविण्‍याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक राहील. राज्‍य शासनाने ठरवून दिलेल्‍या किमान अंतरासह महामार्गावर ट्रक दुरुस्‍ती व ढाब्‍यांची दुकाने सुरु राहतील.
जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठयामधील सर्व सुविधा सुरु राहतील. जीवनावश्यक वस्तु विकणारे प्रतिष्ठान, धान्य व किराणा, फळे व भाज्या, दुधाची दुकाने, अंडे, मास, मच्छी, पशुखाद्य व त्यांचा चारा विक्रीची दुकाने सुरु राहतील. प्रिंट व ईलेक्‍ट्रॉ‍निक मिडीया, डिटीएच व केबल वाहिनी सेवा, माहिती व तंत्रज्ञानाच्‍या सेवा ५० टक्‍के कर्मचा-यासह सुरु राहतील. शासकीय कामाकरीता डाटा आणि कॉल सेंटर ग्रामपंचायत स्तरावरील सामान्‍य सेवा केंद्र, कुरिअर सेवा, शितगृहे आणि वखार महामंडळाची गोदामे, कार्यालय आणि निवासी संकुलांची देखभाल आणि देखभाल करण्यासाठी खाजगी सुरक्षा सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, लॉकडाउनमुळे, वैद्यकीय व आपत्कालीन कर्मचारी व अडकलेल्या पर्यटक आणि व्यक्तींसाठी हॉटेल, लॉज सुरु राहतील. सेवादेणा-या व्‍यक्‍ती जसे इलेक्‍ट्रीशियन, संगणक/मोबाईल दुरुस्‍ती, वाहन दुरुस्‍त करणारे केंद्र, नळ कारागीर (प्‍लंबर), सुतार आदी जण शासनाच्या सुचनेनुसार कामे करू शकतील. तसेच खानावळीतून जेवन स्वत: घेवून जाणे किंवा खानावळ धारकाने घरपोच जेवन पोहचविणे सुरू राहील, मात्र अशी घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीला चेहऱ्यावर मास्क लावणे व सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. खानावळ मालकाने खानावळीत काम करणाऱ्याव घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करत राहावी. घाऊक विक्री तथा वितरण यासंबंधी असलेल्या सेवा, हलावायाची दुकाने, विज वितरण, विज निर्मिती यासाठी लागणारे ईलेक्ट्रीक ट्रान्सफार्फरची दुरूस्ती करणारे दुकाने सुरू राहतील.
    शासकीय व खाजगी उद्योग/औद्योगीक आस्थानांमधील नगरपरिषद हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग, औद्योगीक आस्थानामध्ये कामगारांना कामाचे ठिकाणी पोहचविण्याची व्यवस्था सामाजिक अंतराच्या नियमांची अंमलबजावणी करून सुरू राहील. जिवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिटस जसे औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे, त्यासंबंधी लागणारा कच्चा माल, ग्रामीण भागातील अन्न प्रक्रीया उद्योग, उत्पादन करणारे युनिट ज्यांना सतत प्रक्रीया आणि त्यांची पुरवठा साखळी, आय.टी. हार्डवेअरचे उत्पादन, कोळसा उत्पादन खाणी व खनिज उत्पादन त्यांची वाहतून तसेच विस्फोटकांचा पुरवठा आणि प्रासंगिक खाण कामे, पॅकेजींग सामग्रीचे उत्पादन युनिट, ताग उद्योग जेथे पाळीने काम चालते यामध्ये सामजिक अंतराच्या नियमाची अंमलबजावणीसह, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीणा भागातील विटाभट्टी हे कामे सुरू राहतील. तसेच गव्हाचे पिठ, डाळी व खाद्य तेल ही लघु उद्योग सुरू राहतील.
बांधकाम अंतर्गत नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेता्रतील रस्ते,सिंचन प्रकल्प, ईमारतींचे बांधकाम तसेच सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्पाचे बांधकाम, नविनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम, नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहे व बाहेरून मजूर आणण्याची गरज पडणार नाही अशी कामे सुरू राहतील. तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता, पॉवर ट्रान्समिशन्स लाईनची उभारणी, टेलीकॉम ऑप्टीकल फायबर व केबल टाकण्याबाबतची कामे, मान्सुनपुर्व करावयाची तात्कालीक कामे सुरू राहतील. तथापि बांधकाम संबंधीत यंत्रणेने त्या क्षेत्रातील नगरपरिषदचे /नगरपंचायत चे मुख्यअधिकारी यांचेकडून परवानगी घ्यावी व त्यांना अटींचे पालन करण्याची हमी देणारे प्रमाणपत्र सादर करावे. प्रकल्प बांधकामाचे अधिकारी विनिर्दीष्ट केलेल्या अटिंचे कठोरपणे पालन करण्यास आणि बांधकामाच्या कामास जबाबदार असतील.
व्यक्तींच्या हालचाली संदर्भात आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा आणि  आवश्यक वस्तू खरेदीसाठी खाजगी वाहने अशा परिस्थितीत चारचाकी वाहनांच्याबाबतीत खाजगी वाहन चालकाव्यतिरिक्त एका प्रवाशाला परवानगी दिली जाऊ शकते, मात्र दुचाकी वाहनांच्या बाबतीत केवळ वाहन चालकास पोलीसविभागामार्फत परवानगी आहे. तर जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाचे ठिकाणी जाणारे व कामावरून येणारे सर्व कर्मचारी  सुरक्षा पासेससह जाण्यास परवानगी आहे.
केंद्र शासनाची कार्यालये आरोग्य व कुटुंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र, एन.सी.सी., नेहरू युवा केंद्र सुरू राहतील. राज्य शसनाची कार्यालये पोलीस, होमगार्ड, अग्न‍िशमन, आपतकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर परिषद, नगर पंचायत कोणत्याही निर्बंधाशिवा सुरू राहतील. राज्य शासनाच्या इतर खात्याचे वर्ग अ आणि ब चे अधिकारी त्यांच्या अधिनस्ते असलेल्या कर्मचारी वृंदापैकी १० टक्के कर्मचारी वृंदासह उपस्थित राहणे आवश्यक आहे, परंतू सदर कर्मचारी यांनी सामाजिक अंतर पाळून काम करावे व सामान्य जनतेला पुर्ण सेवा मिळेल याची खात्री करावी. जिल्हा प्रशासन व कोषागर ही कार्यालये निर्बंधीत कर्मचारी संख्येसह सुरू राहतील. तथापि सार्वजनिक सेवा उपलब्ध होईल याची खात्री करून त्यासठी आवश्यक कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा. वन कार्यालय, प्राणीसंग्रहालय, रोपवाटीका, वन्यजीव, जंगलातील वणवा/आगी नियंत्रणकरणारी यंत्रणा, वृक्षरोपण, गस्त घालणे इत्यादी कामे सुरू राहतील.
   उद्योग व औद्योगिक आस्थानामधील शिथीलता ही संबंधीत औद्योगिक युनिट http://permission.midcindia.org या संकेतस्थळावर शासनास कळवतील व त्या अटी पाळण्याची हमी देणारे प्रमाणपत्र शासनास सादर करतील. वरिल परवानगीशिवाय इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. वरील संकेतस्थावरील स्वत:च्या घोषणेच्या आधारे वाहतूकीची परवानगी निर्माण करण्यासाठी देखील वापरल्या जातील यासंदर्भात अंमलबजावणीस सचिव (उद्योग) आणि महाराष्ट्र आद्योगीक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदार राहतील.
            वरील मार्गदर्शक सुचनांबाबत करावयाची कार्यवाही दिनांक 20 एप्रिल 2020 पासून अंमलात येईल असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात उल्‍लेखीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत शिथिलता देण्यात आली असली तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. शासन व प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी