रमजानच्या महिन्यात शासन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा

v कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मुस्लीम बांधवांना आवाहन
यवतमाळ, दि. 22 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहेत. त्यातच नजीकच्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधवांनी शासन व प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहे.
रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशीदमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. तसेच या काळात मुस्लीम समाजातील बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सध्याची स्थिती लक्षात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यातून जीवितहानीसुध्दा होऊ शकते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या तसेच जीवनाच्या हिताचे असल्याने सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा न करणे हितावह ठरणार आहे.
याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या परिस्थितीत राज्य शासनाने दिलेल्या सुचनांचे रमजान महिन्यातही कटाक्षाने पालन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यात कोणत्याही परिस्थितीमध्ये मशिदमध्ये नियमित नमाज पठण, तेरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या किंवा इमारतीच्या छतावर तसेच मोकळ्या मैदानावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करू नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, याची समाजबांधवांनी नोंद घ्यावी. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तराबीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. टाळेबंदीविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांच्या अधिनस्त उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत उपविभाग किंवा तालुका स्तरावर मुस्लीम बांधवांच्या प्रमुख नेत्यांची रमजानपूर्वी सभा आयोजित करून शासनाच्या या सुचनांबाबत त्यांना अवगत करावे. उपरोक्त सुचनांचे उल्लंघन करणा-या व्यक्तिवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.  
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी