प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू राहणार


v सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नागरिकांना आवाहन
       यवतमाळ, दि. 12 : आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेले नागरिक यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 10 व 20 मध्ये वावरल्यामुळे हा भाग प्रतिबंधित (कंटेनमेंट) करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रभाग क्रमांक 10 व 20 येथे जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आता सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
            या भागातील दुग्धजन्य दुकाने, पिठाची गिरणी, किराणा दुकाने, औषधी दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागातील नागरिक पायी जाणे-येणे करून किराणामाल, दूध इत्यादी वस्तु विकत घेऊ शकतात. मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात सर्व प्रकारचे वाहने फिरविण्यावर बंदी कायम राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच या भागात शहरातील इतर भागातील कोणताही व्यक्ती संचार करणार नाही व या भागातील लोक इतर बाहेर ठिकाणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. किराणा दुकानदार व इतर दुकानदार यांना त्यांच्या दुकानात माल भरणा करावयाचा असल्यास त्यांनी तो रात्री 9 ते सकाळी 7 या कालावधीतच गाड्या उतरवून माल भरणा करावा, असेही आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे.
सोबतच नगर पालिका प्रशासनाने सदर भागात फळे, भाजीपाला विक्रीबाबत कार्यवाही करावी. या परिसरात कुठेही फळे, भाजीपाला याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.
प्रभाग क्रमांक 10 आणि 20 हे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेले डॉक्टर्स नियुक्त करून त्या डॉक्टरांचे मोबाईल क्रमांक संबंधित प्रभागात सर्व नागरिकांपर्यंत पोहचवावे. येथील नागरिकांना औषधोपचाराबाबत मागणी असल्यास प्रिसक्रिप्शनद्वारे ‘कॅश ऑन डिलेव्हरी’ या माध्यमातून पुरविण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी