यवतमाळच्या शिवभोजन केंद्रावर गरजुंना मोफत भोजन



v  पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने घरपोच सेवा उपलब्ध
यवतमाळ, दि. 7 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. रोजमजुरी करणा-या नागरिकांना खाण्यापिण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथे गरजूंच्या मोफत भोजनाची व्यवस्था सुरू केली. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रावरून गरजूंना भोजन पुरविण्यात आहे.
संचारबंदी व लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी अनेक कुटुंबांची दोन वेळच्या जेवणाचीही सोय नाही. अशा नागरिकांच्या पोटात दोन घास जावे, यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन केंद्रावर व्यवस्था करण्यात आहे. गरजूंना वरण, भात, भाजी, चपाती असे भोजन देण्यात येते. यासाठी पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रभागानुसार वितरण व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
यासाठी स्वयंसेवकामार्फत प्रभागनिहाय नावे आलेल्या नागरिकांना मोफत भोजन दिले जात आहे. तसेच हे स्वयंसेवक दररोज शिवभोजन केंद्रात घरपोच भोजनाची ऑर्डर नोंदवितात. त्यानुसार ज्यांनी भोजनाच्या डब्याची गरज असल्याचे सांगितले, त्यांना घरपोच डबा दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सुचनांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येते. या उपक्रमांतर्गत दररोज 700 ते 800 नागरिकांना घरपोच भोजनाची सोय उपलब्ध करून दिण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील शिवभोजन थाळीसाठी गरजूंकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या उपक्रमास शहरातील गरजू नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून दररोज लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. देशात लॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी