33 नागरिकांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी


v दोन पॉझेटिव्ह वाढले, एकूण संख्या 78 वर
यवतमाळ, दि. 30 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 2 जणांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78 वर पोहचली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 33 जणांना सुट्टी देण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
आयसोलेशन वॉर्डात गत 24 तासात एक जण भरती झाला असून सद्यस्थितीत भरती रुग्णांची संख्या 282 आहे. यापैकी 204 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. आज तपासणीकरीता सात नमुने पाठविण्यात आले. आतापर्यंत सुरवातीपासून एकूण 1155 नमुने तपासणीकरीता पाठविले आहे. यापैकी 1140 अहवाल प्राप्त आहे तर 15 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी 1052 नमुने निगेटिव्ह आले आहे. गत 24 तासात 15 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी दोन नमुने पॉझेटिव्ह, 10 निगेटिव्ह आणि तीन नमुने निश्चित सांगता येत असल्याने त्यांना तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 201 तर गृह विलगीकरणात एकूण 880 जण आहेत.
०००००००
वृत्त क्र. 351
यवतमाळ शहरातील भाजी मंडी पुर्ववत सुरु
v पासधारक व आधारकार्ड धारकांनाच मिळणार प्रवेश
यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी मंडीमध्ये ठोक भाजीपाला खरेदी 1 मे 2020 पासून सुरुवात करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कोव्हिड –19 च्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरु करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याअनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण 24 ग्रीन झोन विभागातील मैदान व जागेत दररोज सकाळी 8 ते 12 या कालावधीत भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार, हातगाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी 3 ते 6 वाजता दरम्यान विठ्ठलवाडी मार्केट मंडीमध्ये करतील. फक्त पासधारक व आधारकार्ड धारकांनाच प्रवेश मंडीत मिळेल. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही. तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही.
सकाळी 6 वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल. कोणत्याही संशयीत व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
ठोक खरेदीदारांनी व हातगाडी धारकांनी भाजीपाला खरेदी केला असेल त्यांनी नगर परिषदेने तयार केलेल्या यवतमाळ शहरातील 24 केंद्रावरच भाजीपाला विक्री करावा. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व इतर नियमांचे सक्त पालन करावे, असे जिल्हाधिका-यांचे निर्देश आहेत.
सदर बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, नगर परिषद मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, भाजीपाला असोशिएशनचे अध्यक्ष श्री.बरे, सचिन कुडमेथे, राजेश गुर्जर, गजानन वडेकर, विक्रेता खरेदीदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नोडल अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती : यवतमाळ शहरात मुख्य भाजी मंडीतून यवतमाळ शहराच्या सर्व भागात योग्यरितीने भाजीचे वितरण होण्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडी दररोज सकाळी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहील व सकाळी 6.15 वाजेनंतर त्या ठोक भाजी मंडीमध्ये कोणीही राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यवतमाळ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातून सदर ठोक भाजी मंडीमध्ये कोणतेही हमाल, एजंट, ठोक विक्रेता, किरकोळ विक्रेता किंवा नागरिक येणार नाही याची दक्षता घ्यावी. ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीची दुकाने Odd-Even या पध्दतीने सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीच्या दुकानाव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने लागणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परिसरात निर्जंतूकीकरण, नियमित स्वच्छता मुख्याधिकारी, न.प. यवतमाळ यांच्या यंत्रणेमार्फत करून घ्यावी. ठोक भाजी मंडीमध्ये प्रत्येक किरकोळ भाजी विक्रेता व ठोक भाजी विक्रेता यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे व त्यांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच त्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डवॉशची व्यवस्था करावी. वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने आवश्यक त्या उद्घोषणा भाजी मंडीमध्ये कराव्यात. वरीलप्रमाणे सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी यांची राहील. या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशित केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी