कोरोना : व्हीसीद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला तालुक्यांचा आढावा


यवतमाळ, दि. 8 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या यंत्रणेचा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी व्हीसीद्वारे आवाढा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, कोरोना संदर्भात तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या समितीने रोज यंत्रणेची बैठक घ्यावी. तसेच आपापल्या भागात सामूहिक पेट्रोलिंग करावी. नियमित  अन्नधान्य वाटप व मोफत धान्य पुरवठ्याबाबत नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत नियोजन करावे. तालुका स्तरावर ‘कोरोना वॉरिअर्स’ असा ग्रुप तयार करून सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना त्यात समाविष्ठ करावे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत त्यांची मदत प्रशासनाला घेता येईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना वाटप सध्या सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी कार्यवाही करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्तरावर ताप आणि कोव्हिडच्या अनुषंगाने आढळणारे एक-दोन लक्षणांसाठी ‘फिवर क्लिनिक’ सुरू करावे, आदी सुचना त्यांनी केल्या.
यावेळी त्यांनी विलगीकरणाबाबत उपाययोजना, मरकझ (निजामुद्दीन) वरून आलेल्या नागरिकांचा शोध, पुणे, मुंबई व इतर शहरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती, सोशल डिस्टन्सिंग, जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, फळे आदींची वितरण व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कलम 144 ची अंमलबजावणी, तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये थांबलेल्या लोकांना देण्यात येणा-या सुविधा, सामाजिक संघटनांची मदत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या भागात काही नाविन्यपूर्ण केलेल्या बाबी आदींचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी