1032 प्रकल्पातून 2 लक्ष हेक्टर सिंचन क्षमतेची निर्मिती
* 714 सिंचन प्रकल्प पूर्ण
* 318 प्रकल्प बांधकामाधीन
यवतमाळ, दि. 26 : बहुतांश शेतकरी कृषिवर आधारीत असल्याने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे. यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा असून बहुतांश शेतकऱ्यांचे कापुस हेच मुख्य पिक आहे. कापसासह अन्य पिकाला पुरसे सिंचन उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक सिंचन प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आल्याने जिल्ह्यात आजमितीस 2 लक्ष 5 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
जिल्हा विस्ताराने मोठा असून काही भाग अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक लहान मोठे प्रकल्प हाती घेवून ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 13 लाख 58 हजार हेक्टर असून त्यापैकी शेतीलायक क्षेत्र 8 लाख 86 हजार इतके आहे. या शेतीलायक बहुतांश क्षेत्राच्या टप्प्यात अनेक लहान मोठे सिंचन प्रकल्प घेण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात 5 मोठे, 10 मध्यम, 85 लघू तसेच स्थानिक स्तरीय प्रकल्प आहेत.
यापैकी डिसेंबर 2015 अखेर पूर्ण झालेल्या व बांधकामाधीन प्रकल्पातून 2 लाख 5 हजार इतके हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. निम्न पैनगंगा हा महाराष्ट्र व आंध्रप्रदेशचा आंतरराज्यीय मोठा सिंचन प्रकल्प बांधकामाधीन आहे. केवळ या एकाच प्रकल्पातून 2 लाख 27 हजार इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार हेक्टर क्षेत्राला प्रकल्पाचा लाभ होणार आहे. लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पातून 58 हजार हेक्टर तर आंध्रप्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील 27 हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येईल.
सिंचन क्षमता निर्माण झालेल्या प्रकल्पांमध्ये पुस या मोठ्या प्रकल्पातून 9182 हेक्टर, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, लोअर पुस या 5 मध्यम प्रकल्पातून 26584 तर कोल्हापूरी बांधऱ्यासह लघु तथा स्थानिक स्तरीय 707 प्रकल्पातून 70791 असे पूर्ण झालेल्या प्रकल्पातून 1 लाख 6 हजार 558 इतके हेक्टर सिंचनाची निर्मिती झाली आहे. बांधकामाधीन अरूणावती, बेंबळा, उर्ध्वपैनगंगा, निम्नपैनगंगा या 4 प्रकल्पातून 78168, अडाण, नवरगाव, वर्धा बॅरेज, टाकळी, डोल्हारी या बांधकामधीन प्रकल्पातून 12945 तर कोल्हापूरी बंधाऱ्यासह लघु व स्थानिक स्तरच्या 310 प्रकल्पातून 7717 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
या पूर्ण झालेल्या व बांधकामाधीन 1032 प्रकल्पाची प्रकल्पीय सिंचन क्षमता 4 लाख 22 हजार 400 इतकी आहे. त्यापैकी 2 लाख 5 हजार 388 इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातील 318 प्रकल्प बांधकामाधीन असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिकीकरणासाठी सिंचन प्रकल्प अतिशय महत्वाचे आहे. याच उद्देशाने जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे मोठे जाळे निर्माण करण्यात आल्याने आगामी काळात हे प्रकल्प संपूर्ण जिल्ह्याला आर्थिकदृष्ट्या समृध्द करणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी