सव्वाकोटीच्या सावकारी कर्जातून 1087 शेतकऱ्याची मुक्तता
*शेतकऱ्यांना मिळाला सावकारी कर्जातून दिलासा
*जिल्हास्तरीय समितीकडून आदेश पारीत
यवतमाळ, दि. 29 : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय 2014च्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एक कोटी 14 लाख रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले आहे. यामुळे 1087 शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन त्यांची सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यासोबतच सावकराकडे असलेले तारणही परत मिळणार आहे.
नोंदणीकृत सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि त्यावरील व्याज या योजनेंतर्गत सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे सावकारांकडे असलेले तारण परत करण्यात येऊन सावकाराकडून त्यासंबंधीचे हमीपत्र सादर करावे लागत आहे.
जिल्ह्यातील 101 परवानाधारक सावकारापैकी 91 सावकारांनी सात हजार 576 शेतकऱ्यांचे सहा कोटी 41 लाख 32 हजाराचे प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केले आहे. यापैकी तालुकास्तरीय समितीने 50 सावकारांकडील एक हजार 93 शेतकऱ्यांचे एक कोटी 17 लाख 4 हजार रूपयांचे प्रस्ताव मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने यापैकी एक हजार 87 सभासदांच्या एक कोटी 18 लाख 21 हजार रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. जिल्ह्यामध्ये 1 कोटी 18 लाख 49 हजार 642 रूपये जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले असले तरी शासनाकडून एक कोटी 15 लाख रूपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार एक कोटी 14 लाख 75 हजार 882 रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले. उर्वरीत कर्ज माफ करण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली असून सावकारी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सावकारांचे सहायक निबंधक यांच्याकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. सुरवातीला या योजनेत सावकाराने परवाना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यास कर्ज दिले असल्यास ते या योजनेस पात्र ठरविण्यात आले नव्हते, मात्र शासनाने ही अटही शिथिल करून सरसकट सर्वच सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी