पात्र शेतकऱ्यांनी ‘कर्जा’साठी बॅंकेत ‘अर्ज’ द्यावे
*कर्ज नाकारल्‍यास प्रशासनाशी संपर्क साधावा 
यवतमाळ, दि. 13 : जिल्‍ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कुठल्‍याही बॅंकेतून कर्जाची उचल केली नाही किंवा थकीत कर्ज नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी बॅंकेत कर्ज मागणीसाठी अर्ज करावा. अर्ज करून पिककर्ज मिळाले नसल्‍यास शेतकऱ्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
शेतकरी पुनर्गठनास किंवा नविनीकरणास पात्र आहे, अशा शेतकऱ्यांच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर शेतकरी कर्जासाठी बॅंकेत अर्ज करू शकतात. खरीप हंगामाच्‍या लागवडीकरिता जिल्‍ह्यातील आजपर्यंत कुठल्‍याही बॅंकेचे कर्ज घेतले नाही, मात्र अशा शेतकऱ्यांना उसणवारी कर्ज घेतल्‍याशिवाय लागवड करता येत नाही. अशा शेतकऱ्यांनी यावर्षी कर्जासाठी बॅंकेत अर्ज करावे जेणेकरून अशा शेतकऱ्यांना इतरांकडून उसणवारीसाठी  जावे लागणार नाही. त्‍यांना हंगामात कर्ज मिळणे सुकर होईल. तसेच आपल्‍या गावातील शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी ग्रामस्‍तरीय समितीचे अध्‍यक्ष आणि सचिव यांनी बॅंकेशी संपर्क साधून कर्जाची उपलब्‍धी करून द्यावी. असे निर्देशही जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे.
जिल्‍हयामध्‍ये बळीराजा चेतना अभियानासारखी लोकचळवळ राबविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना स्‍थैर्य आणि धैर्य देण्‍यासाठी विविध उपाययोजना राबविण्‍यात येत आहे. या अभियानाचा एक उपक्रम म्‍हणून बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये प्रत्‍येक बॅंक शाखेमध्‍ये शेतीकरिता कर्जपुरवठा मिळावा म्‍हणून ‘अर्ज द्या, कर्ज घ्‍या’ अभियान राबविण्‍यात आले. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. मात्र, गावातील जे शेतकरी पुनर्गठण किंवा नविनीकरणास पात्र आहे, अशा शेतकऱ्यांच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर शेतकरी कर्ज मिळण्‍यापासून वंचित राहिलेले आहे. अशा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा बॅंकेमार्फत करण्‍यात येणार आहे. यासाठी मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल यांनी आपल्‍या भागातील बॅंकेत शेतकऱ्यांच्या कर्जासाठी बॅंकेशी संपर्क साधून कर्ज मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनो संपर्क साधा
शेतकऱ्यांनी कर्ज मिळण्‍यासाठी बॅंकेत अर्ज करूनही कर्ज मिळाले नसल्यास संबंधित तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्ष (दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४१००) यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी