सुव्यवस्था राखण्यासाठी विभागांनी समन्वय राखावा
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
*वन अतिक्रमणाची एकत्रित यादी द्यावी
*येत्या काळात यंत्रणांनी सतर्क राहावे
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात येत्या काळात गणपती, दुर्गादेवी उत्सव, नगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच आपसात समन्वय राखून कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. आज बचत भवन येथे जिल्हास्तरावरील महत्त्वाच्या विभागाप्रमुखांची बैठक कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमणाचा मुद्दा सध्या मोठा आहे. शहरातील अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊन अपघात वाढीस लागले आहे. अशा अपघातप्रवणस्थळांची यादी तयार करून त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही व्हावी. नगरपालिकांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. हे अतिक्रमण काढून त्याचा उपयोग झाल्यास याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होण्यास आळा घालता येईल. तसेच वन जमिनीवरील अतिक्रमणामुळे काही ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणांची यादी जिल्हास्तरावर सादर करून याप्रकरणी समन्वयातून मार्ग काढण्यावर भर देण्यात येईल. मारेगाव येथील वन अधिकारी आणि नागरीकांमध्ये झालेल्या प्रकरणी वन विभागाने कारवाई करताना सोबत आपला कॅमेरा ठेवावा, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर होणारे आरोप पडताळता येतील.
शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही, यासाठी विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सूचित करण्याचे सांगितले. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरीकाला सौजन्याची वागणूक देण्याच्या सूचना करून जिल्हाधिकारी यांनी केली. सीसीटीव्हीमुळे कार्यालयातील अभ्यागतांचेही वर्तन नियंत्रित राहत असल्याने प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, यासाठी प्रत्येक कार्यालयाला निधी दिला जाणार असल्याचे सांगितले.
शहरामधील अनधिकृत जागेवरील धार्मिकस्थळांचा प्रश्न मोठा असून याबाबत तातडीने कारवाई करावी. केवळ 1960 पूर्वीचे धार्मिक स्थळ नियमित करण्यात येते. मात्र त्यानंतरचे कोणतेही धार्मिक स्थळ नियमित करण्यात येत नसल्याने ही स्थळे हलविण्यात यावी, यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. नगरपालिकांनी शहरातील निर्जनस्थळे शोधून त्याठिकाणी हायमास्ट उभारून दिवाबत्तीची व्यवस्था करावी, कत्तलखान्यांमुळे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिकृत कत्तलखाने उभारण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अवैध सावकार प्रकरणी जास्तीत जास्त कारवाई करावी, शाळा महाविद्यालयाजवळील गुटखा बंदीची कारवाई करावी. यासाठी पोलिस बंदोबस्त आवश्यक असल्यास त्यांची मदत घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी