नागरीकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवावी
*जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागप्रमुखांना निर्देश
*दर सोमवार, शुक्रवारी भेटीसाठी 12 ते 2 वेळ
*अडीअडचणी ऐकून निराकरण करावे लागणार
यवतमाळ, दि. 22 : शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि विभागप्रमुखांच्या भेटीसाठी जिल्हाभरातून सर्वसामान्य नागरीक समस्या घेऊन येत असतात. मात्र त्यांच्या भेटीसाठी निश्चित वेळ आणि दिवस नसल्याने त्यांची गैरसोय होते. काही वेळा या नागरीकांना भेटीविनाच परत जावे लागते. यावर उपाययोजना म्हणून अधिकारी आणि विभाग प्रमुखांना आता नागरीकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवावी लागणार आहे. सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 2 ही वेळ नागरीकांच्या भेटीसाठी राखीव ठेवावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरीक त्यांचे विविध प्रश्न घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना भेटायला येत असतात. मात्र नागरीकांना भेटण्यासाठी दिवस व वेळ निश्चित नसल्यामुळे तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दौरे, कार्यक्रम, बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे नागरीकांना बरेचदा अधिकाऱ्याच्या भेटीशिवाय परत जावे लागते. यामध्ये नागरीकांचा वेळ, श्रम वाया जातो, तसेच आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. नागरीकांची ही गैरसोय लक्षात घेता कार्यालय प्रमुख आणि अधिकारी यांनी आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी नागरीकांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान कार्यालयात उपस्थित राहावे.  नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतेही शासकीय दौरे, बैठक, कार्यक्रम आयोजित करू नये, याबाबतचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी