जिल्ह्यात विक्रमी वृक्षारोपण
नागरीकांनी आता वृक्ष जगविण्यासाठी पुढाकार घ्यावा
- सचिंद्र प्रताप सिंह
* जिल्ह्यात १७ लाख ३५ हजार वृक्षांचे रोपण
* वनविभागाने लावली सर्वाधिक झाडे
* इतर विभाग व नागरीकांकडून ४ लाख वृक्षारोपण
यवतमाळ, दि. ११ : पर्यावरणाच्या संतुलनासोतच वृक्षाच्छादित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिनांक १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विक्रमी म्हणजे १७ लाख ३५ हजार इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांचा यात मोठा हातभार असून ही झाले जगविण्यासाठीही नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी असलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धानवे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एम.आर.चेके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वृक्ष लागवड मोहिमेत विविध शासकीय कार्यालयांसोबतच सामाजिक संघटना व सामान्य नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण एकाच दिवशी करण्यात आले. जिल्ह्याला या दिवसासाठी १७ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. प्रत्यक्षात १७ लाख ३५ हजार वृक्ष लावण्यात आले. वनविभागाने सर्वाधिक वृक्षांची लागवड केली.
दिनांक १ जुलै रोजी लावण्यात आलेल्या वृक्षांमध्ये वनविभाग यवतमाळने ५ लाख ४८ हजार ३०० वृक्ष लावले आहे. त्यापाठोपाठ वनविभाग पांढरकवडाने ४ लाख ७३ हजार ३०० इतकी झाडे लावली. वनविभाग पुसदने २ लाख ४८ हजार वृक्षांचे रोपण केले. सामाजिक वनिकरण विभागाने २३ हजार झाडे लावली. वन्यजीव विभागाने ३१ हजार, वनविकास महामंडळाने ३ हजार झाडे लावली.
विविध शासकीय कार्यालयांना आपल्या आवारातील मोगळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे उद्दिष्ठही देण्यात आले होते. यवतमाळ शहरासह तालुका व ग्रामीण भागातील विविध शासकीय कार्यालये तसेच सामाजिक संघटना व नागरीक मोठ्या प्रमाणात मोहिमेत सहभागी झाल्याने इतर शासकीय कार्यालये व स्वयंसेवी संस्था तथा नागरीकांनीमिळून ३ लाख ६८ हजार ८७७ इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण मोहिमेला चळवळीचे रूप प्राप्त झाले होते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होऊ शकले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याताल सर्व स्वयंसेवी संस्था व नागरीकांचे आभार मानले असून लावलेली झाले जगविण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी