सातासमुद्रापलीकडील मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब ‘कर्जमुक्त’
*72 हजारांच्या कर्जाची एकमुस्त परतफेड
*मधुमेहग्रस्त बालकासाठी इन्सुलीनची व्यवस्था
यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पेरणीपूर्वी कर्ज मिळावे म्हणून शासन आणि प्रशासन कडून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कारेगाव बंडल येथील रेखा अशोक चिंतलवार आणि असाध्य रोगाने जगण्याची लढाई लढणारे ज्ञानेश्वर अशोक चिंतलवार यांना बँकांनी थकीत कर्जामुळे पुनर्गठणास नकार दिला. पेरणी करण्यास अडचणीत आलेल्या या कुटुंबियांना अबुधाबी येथे तेल कपंनीतील रेडिओ अधिकारी असलेले मुंबई येथील फारुख तारपूरवाला यांनी 72 हजार रूपयांची मदत करून पिककर्जमुक्त केले.
यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, केळापूरचे तहसिलदार श्री. जोरावार, गटविकास अधिकारी श्री. घसाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, अंकित नैताम उपस्थित होते.
शासनाच्या आदेशानंतरही राष्ट्रीयकृत बँका पिककर्ज देण्यास अनुत्सुक आहे. याचा प्रत्यय केळापुर तालुक्यातील कारेगाव बंडल येथे आला. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील रेखा अशोक चिंतलवार व ज्ञानेश्वर अशोक चिंतलवार यांना पाटणबोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१५-१६ थकीत पीककर्ज असताना पुनर्गठनासाठी नकार दिला होता. मात्र आबुधाबी येथील रेडिओ अधिकारी असलेले फारुख तारपूरवाला यांनी पांढरकवडा येथे येऊन राष्ट्रीयकृत बँकांचे मागील वर्षाचे ६५ हजार रूपयांचे पिककर्ज आणि त्यावरील व्याज असे ७२ हजार रुपयांचा धनादेश चिंतलवार परिवाराला शेतकरी मिशनच्या ‘सरकार आपल्या दारी’ या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात दिला.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत गटविकास अधिकारी यांनी या परिवाराला आधीच आर्थिक मदत दिली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी के. झेड. राठोड यांनी ज्ञानेश्वरला बाल-मधुमेह टाईप वनसाठी लागणारे महागडे विशेष इन्सुलिन असल्यामुळे अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत यांना दिले. हे औषध ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या फ्रिजसाठी श्री. तारपूरवाला यांनी तात्काळ १० हजारांची मदत रेखा चिंतलवार यांना दिली.
यावर्षी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या संयुक्त वतीने बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रमात या  चिंतलवार कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना देशी कापूस बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती श्री. सातपुते यांनी दिली.
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात 1736 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. 30 जूनपर्यंत संपूर्ण कर्जाचे वितरण करणे बँकांनी अपेक्षित होते. यासाठीच ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ उपक्रमही राबविण्यात आला. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बैठक घेऊन बँकांना वेळोवेळी सूचना केल्या. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ३७ टक्केच कर्ज वितरण केले आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने ४६४ कोटी पैकी १६७ कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी