तालुकास्तरावर कुपोषित बालकांसाठी विशेष कार्यक्रम
-पालकमंत्री संजय राठोड
*महाआरोग्य शिबीराचा गोषवारा सादर करावा
*शिबीरातील प्रत्येक रूग्णाला सेवा मिळणार
*जलजन्य आजाराबाबत सतर्क राहावे
यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात अत्यंत चिंताजनक अवस्थेतील सुमारे दोन हजार 100 कुपोषित बालके आढळली आहे. या बालकांची श्रेणीवाढ करून त्यांना सामान्य बालकांमध्ये आणण्यासाठी या बालकांसाठी येत्या 27 जुलै रोजी प्रत्येक तालुकास्तरावर माता-बालकांच्या तपासणीसोबतच त्यांना पोषण आहार देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. आज कुपोषित बालकांचा प्रश्न आणि त्यांना द्यावयाचा पोषक आहाराबाबत बैठक घेण्यात आली.
यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शहर आणि ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या अधिक आहे. त्यांना पोषक आहार देऊन सामान्य बालकांच्या श्रेणीत आणणे हे मोठे आवाहन आहे. या बालकांसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असली तरी जिल्हा पातळीवर महाआरोग्य सेवा समितीच्या मायमातून त्यांना मदत करण्यात येणार आहे. पोषक आहार देऊन हा प्रश्न सुटेल असे नाही, त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची मदत घेऊन त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात येतील. तसेच या बालकांचे कुपोषित श्रेणीमध्ये येण्यामध्ये मातांची प्रकृतीही चांगली असणे आवश्यक आहे. त्यासाठी कुपोषित बालकांसोबत त्यांच्या मातांचीही तपासणी करण्यात येईल. या बालकांना किमान तीन महिने पोषक आहार दिल्यास त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या महारोग्य शिबीराचाही पालकमंत्री यांनी आढावा घेतला. नोंदणी व्यतिरिक्त वेळेवर झालेल्या रूग्णांना शोधणे हे मोठे आव्हान आहे. आशा कार्यकर्त्यांमार्फत अशा रूग्णांना शोधून त्यांना योग्य उपचार मिळालेला असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक आरोग्य यंत्रणेने नोडल अधिकारी नेमून रूग्णाचे नाव, त्याचा आजार आणि त्याला उपचार मिळालेले ठिकाणी याची यादी तयार करून महाआरोग्य शिबीराची फलश्रुती जनतेसमोर आणावी. या शिबीरातील प्रत्येक रूग्णाला सेवा मिळण्यासाठी 20 जुलै पर्यंत ही यादी तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिले.
जिल्ह्यात अनेक तालुक्यात जलजन्य आजाराची लागण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही त्याचा फारसा परिणाम दिसत नसल्याने आरोग्य यंत्रणेने स्वच्छता विषयक बाबींवर लक्ष केंद्रीत करून जनजागृती करावी. यासाठी कुपोषित बालकांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये हात धुण्याच्या लिक्वीडचाही समावेश करावा, अशी सुचना पालकमंत्री यांनी यावेळी केली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नसल्यास ग्रामसेवकाला जबाबदार धरण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी