बळीराजा अभियान एमबीबीएस प्रवेशाचे शुल्क भरणार
* अडचणीतील शेतकऱ्यांच्या पाल्यांना मदत
*प्रथम वर्षाची फी लोकसहभागातून भरणार
*ग्रामस्तरीय समितीकडे अर्ज करावेत
यवतमाळ, दि. २५ : जिल्‍ह्यातील गरजू आणि आर्थिकदृष्‍टया संकटात सापडलेल्‍या शेतकरी कुटुंबांतील पाल्‍यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे, अशा गरजू शेतकऱ्यांच्‍या पाल्‍यांची प्रथम वर्षाची ३० हजारपर्यंतचे प्रवेश शुल्क बळीराजा चेतना अभियानात लोकसहभागातून जमा झालेल्‍या निधीतून करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी संबंधित गावाच्या गावाच्या ग्रामस्तरीय समितीकडून तहसील कार्यालयात प्रस्‍ताव सादर करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
जिल्‍ह्यातील अनेक हुशार, होतकरू विद्यार्थी शेतकरी कुटुंबात आहे. त्‍यांना आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरून मुलांना मोठ्या अपेक्षेने शिकवितात. यातील बरेच विद्यार्थी या संधीच सोनं करतात. मात्र, अनेकदा केवळ उच्‍च शिक्षणासाठी प्रवेशाची संधी मिळूनही आर्थिकदृष्‍ट्या सक्षम नसल्‍याने किंवा शिक्षण शुल्‍क तातडीने भरणे शक्‍य नसल्‍यामुळे ते विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात, परिणामी शिक्षण घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक आधार निर्माण करून दिल्‍यास शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकतो. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्‍ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला लागणारी प्रथम वर्षाची प्रवेश फी सुमारे ३० हजार रूपये बळीराजा चेतना अभियानाच्‍या समितीमध्‍ये लोकसहभागातून जमा झालेल्‍या निधीतून देण्‍याचा निर्णय जिल्‍हा प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी शेतीचा सातबारा, शिधापत्रिका, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार असल्‍याचा पुरावा, भरावे लागणारे महाविद्यालयीन शुल्‍काचा तपशील शेतकरी कुटुंबांना द्यावा लागणार आहे. यासाठी केवळ शेतीवर उपजिविका असणाऱ्या शेतकरी कुटुंबातीलच विद्यार्थ्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशास मदत मिळणार आहे. त्‍या शेतकरी कुटुंबाने आपला प्रस्‍ताव गावात गठित करण्‍यात आलेल्‍या ग्रामस्‍तरीय समितीकडे द्यावा. ही समिती संबधित गावाच्‍या तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयात हा प्रस्‍ताव सादर करून उपविभागीय अधिकारी कार्यालयमार्फत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षाकडे पाठविण्‍यात येणार आहे. प्राप्‍त झालेला विद्यार्थ्यांचा अर्ज समितीच्‍या सभेत अधिष्‍ठाता, वैद्यकीय महाविद्यालय यांच्‍याकडून कागदपत्राची पडताळणी करून संबंधित महाविद्यालयाच्‍या नावाने  धनादेश वितरीत करेल. या योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील शेतकरी पाल्‍यांनी घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी