तंबाखूच्या कर्करोगाबाबत जनजागृती महत्त्वाची
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*संपुर्ण शाळा तंबाखूमुक्त कराव्यात
*कार्यालय प्रमुखांवर दंडाची जबाबदारी
*दुष्परिणामासाठी व्यापक मोहिम
यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यातील बालके अत्यंत अल्प वयातच तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. याचे दुरगामी परिणाम कर्करोगात होणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी याबाबत सजग राहून तंबाखूपासून होणाऱ्या कर्करोगाची शालेय आणि कार्यालयीन पातळीवर जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोगा दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांबाबत विरोधी मत तयार करताना व्यापक जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंबाखूमुळे झालेल्या नुकसानीचे चित्र किंवा इतर साहित्य तयार करून ते गावपातळीवर वितरीत करण्यात यावे. तंबाखू खाण्याची सवय ही आरोग्याशी संबंधित असल्यामुळे जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निमंत्रित करून त्यांच्या उपलब्ध असलेल्या तालुका आणि गावपातळीवरील यंत्रणेच्या सहाय्याने हा कार्यक्रम राबविण्यात यावा. शालेय स्तरावर तपासणी करून ग्रामीण भागातील 100 टक्के शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांच्या 100 मिटर परिसरातील तंबाखू विक्रीची दुकाने हटविण्यात यावी, यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्यावे. प्रत्येक शाळेत परिपाठ किंवा कार्यक्रमाप्रसंगी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच सर्व शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाबाबतचे फलक लावण्यात यावे.
जिल्हामध्ये एप्रिल ते जून दरम्यान घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये सुमारे 200 रूग्ण हे कॅन्सर श्रेणीमध्ये जाण्याच्या स्थितीत आढळून आले आहे. तसेच 36 रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असूनही अनेक ठिकाणी हे प्रकार सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालय प्रमुख, सार्वजनिक ठिकाणांच्या प्रमुखांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी धुम्रपानास आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ दंडात्मक कारवाईवर भर देण्यापेक्षा तंबाखू विक्री करणाऱ्या विरूद्ध गुन्हे दाखल करावे, यामुळे वचक बसण्यास मदत होणार आहे.
त्या तीन स्वयंसेवी संस्थांची चौकशी
यवतमाळ जिल्ह्यात व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या तीन संस्थांना केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे. मात्र या संस्थांचे कोणतेही कार्य जिल्ह्यात दिसून येत नाही. या संस्थांचा कारभार केवळ कागदोपत्री चालत असून त्यांचा समाजाला कोणताही उपयोग झालेला दिसून येत नाही. तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये संस्थेला प्रतिनिधीत्व देऊन सदस्य करण्यात आले आहे, मात्र या संस्थेचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. या तिनही संस्थांची चौकशी करावी, तसेच समितीमध्ये त्यांचे स्थान कोणी निश्चित केले, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी