अल्‍प भूधारक शेतकऱ्याच्‍या मुली बनणार डॉक्टर
*बळीराजा चेतना अभियानाची साथ
*गोंदिया, नागपूर येथे प्रशासाठी मदत
यवतमाळ,  दि. २८ : अल्‍प भूधारक शेतकऱ्याच्‍या दोन मुली वैद्यकीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षेतही अव्‍वल  ठरून केवळ आर्थिक संकटामुळे एमबीबीएस प्रवेशसाठी रखडला होता.  मात्र, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या बळीराजा चेतना अभियानाच्‍या आर्थिक मदतीमुळे एकीचा गोंदिया, तर दुसरीचा नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. त्‍यांना अभियानाच्या माध्यमातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून प्रवेशासाठी मदत दिल्‍याने त्‍यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुभाष गायकवाड यांच्‍या किरण आणि पूजा या नेर-नबाबपूर येथील दोन भगिनी. बारावीच्या परीक्षेत किरण गतवर्षी ८७ टक्के गुण घेऊन तर पूजा ९०.१५ टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाली. या दोघींनी यंदा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दिली. किरणला सीईटी परीक्षेत १६४ तर पूजाला १७७ गुण मिळाले. किरणचा गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि पूजाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरली. परंतु अल्प भू-धारक शेतकरी असलेल्या या दोन्ही मुलींचा मेडीकल प्रवेश आर्थिक अडचणीमुळे रखडला होता. सुभाष गायकवाड यांना २००७ मध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून एक हेक्टर ६१ आर जमिन मिळाली होती. त्याच्यावरच कुटुंबाचे पालनपोषण होत होते. त्यांच्या दोनही मुलींनी बारावी आणि वैद्यकीय पूर्व परीक्षेत यश संपादन केले. परंतु या मुलींच्या प्रवेशासाठी पैशाचा प्रश्न निर्माण झाला. गावातील नागरीकांनी शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचाविणे, त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास निर्माण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्‍या मुलांनाही शिक्षणासाठी मदत करीत असल्‍याची माहिती दिली.  त्यामुळे सुभाष गायकवाड यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय गाठून जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची भेट घेतली. यांच्यापुढे आपली आपबिती कथन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन मुलींच्‍या प्रथम वर्षाच्या शुल्कासाठी बळीराजा चेतना अभियानातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून निधी देऊन प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
अभियानाचा आधार
मुली हुशार असूनही केवळ आर्थिक संकटामुळे त्‍यांचा उच्‍च शिक्षणचा मार्ग रखडला होता. मात्र, अभियानाचा आधार मिळाल्‍याने त्‍यांच्‍या जीवनाचे सोने झाले. जिल्‍ह्यातील  शेतकऱ्यांनी संकटात हतबल न होता त्‍याला  समोर जावे. बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांच्‍या पाठीशी आहे.
सुभाष गायकवाड, नेर
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी