शाळा, महाविद्यांमार्फत राबणार शेतकरी हिताचे उपक्रम
* चेतनादूत म्‍हणून होणार नेमणूक
यवतमाळ, दि. १८ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्‍ये शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे कार्यक्रम आयोजित केल्‍यास विद्यार्थ्‍यांमार्फत सकारात्‍मक संदेश थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्‍यामुळे अशा प्रकारचे उपक्रम शाळा, महाविद्यालयातून राबविण्‍यात यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. यातील सहभागी विद्यार्थी, शिक्षक, मुख्‍याध्‍यापक, प्राचार्य यांची चेतनादूत म्‍हणून निवडही करण्‍यात येणार आहे.
मागील वर्षभरापासून राबविण्‍यात येत असलेल्‍या अभियानाच्‍या विविध उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्‍यास मोठी मदत झाली. याचा परिणाम म्‍हणून १ जानेवारी ते 30 जून या कालावधीत गतवर्षीच्‍या तुलनेत शेतकरी आत्‍महत्‍यामध्‍ये ८१ शेतकरी (४४.५७ टक्‍के) घट झाली आहे. शेतकऱ्यांचे उंचावलेले मनोबल यापुढेही कायम राहावे यासाठी अभियानाची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येत आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांनी आपल्‍या गावात विद्यार्थ्‍यांची रॅली काढून सकारात्‍मक संदेश देणे, शेतकऱ्यांच्‍या जीवनावर नाटिका बसविणे, शेतकरी संबंधित विषयावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, आयोजित करणे, पथनाट्य सादर करणे, सकारात्‍मक संदेश असणाऱ्या भिंती रंगविणे, शासकीय योजनांची माहितीची पत्रके प्रसिद्ध करणे, शेतमाल विक्रीकरिता शाळेमध्‍ये स्‍टॉल लावणे, पशुपालन, दुग्‍ध उत्‍पादनाची माहिती देणे, जोडधंदा करण्‍यास प्रोत्‍साहन देणे, माती परीक्षण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, सेंद्रिय, नैसर्गिक शेती करण्‍यास प्रोत्‍साहन देणे, प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच, शेतकरी हिताचे इतर कोणतेही उपक्रम राबविण्‍याचे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे.
गावामध्‍ये जनजागृतीचे कार्यक्रम घेऊ इच्छितात अशा शाळा, महाविद्यालयांनी  आपल्‍या उपक्रमाचा प्रस्‍ताव संबंधित तहसिल कार्यालय किंवा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात सादर करावा, अशा शाळा, महाविद्यालयांना उपक्रमाचे बॅनर तयार करणे, मुलांना खाऊचे वितरण करणे, रॅलीचे आयोजनाकरिता पाच हजार रूपये तहसिलदार यांच्यामार्फत शाळांना देण्‍यात येणार आहे. यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त शाळा, महाविद्यालयांनी शेतकरी हिताचे उपक्रम राबविण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी